
परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (MBA) ८४ वी चतुर्वार्षिक वार्षिक सर्वसाधारण सभा नागपूर येथे पार पडली. या सभेनंतर सन २०२६-२०३० या कालावधीसाठी असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली. असोसिएशनचे यापूर्वी अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले अरुण लखानी यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध फेरनिवड करण्यात आली असून रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगसरेवक, बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड (BOR) चे अध्यक्ष परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सन २०२६-२०३० या कालावधीसाठी असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची विविध पदांसाठी एकूण ५१ नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २५ सदस्यांची MBA च्या गव्हर्निंग कौन्सिलवर सन २०२६-२०३० या कालावधीसाठी निवड करण्यात आली. बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे माजी अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर हे २०१४ साली महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवडून आलेले रायगड जिल्ह्याचे शेवटचे प्रतिनिधी होते. त्यानंतर तब्बल १२ वर्षांच्या कालावधीनंतर परेश ठाकूर यांच्या निवडीमुळे रायगड जिल्ह्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या बॅडमिंटन प्रशासनाच्या सर्वोच्च नेतृत्वात प्रतिनिधित्व मिळाले आहे.
या अभिमानास्पद नियुक्तीबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, तसेच सभागृहनेते ऍड. प्रकाश बिनेदार यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी नवनियुक्त उपाध्यक्ष परेश ठाकूर यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे ज्येष्ठ उपाध्यक्ष रवींद्र भगत, उपाध्यक्ष शिवकुमार कराईल, सहसचिव प्रशांत मुखर्जी, खजिनदार नरेंद्र जोशी, माजी नगरसेविका नीता माळी आदी उपस्थित होते.

बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड (BOR) चे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना परेश ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यात बॅडमिंटनच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडने खेळाडूंना आर्थिक मदत, होतकरू बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन व प्रायोजकत्व, विविध बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन तसेच भरीव पारितोषिकांची व्यवस्था करून खेळाडूंना उच्चस्तरीय बॅडमिंटनमध्ये सहभागी होण्यासाठी अधिकाधिक संधी आणि प्रोत्साहन उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांमुळे रायगड जिल्हा बॅडमिंटनमधील गुणवंत खेळाडूंचे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून पुढे येत असून यामधून प्रतिभावंत खेळाडू तयार झाले आहेत. त्याच अनुषंगाने सध्या मास्टर देव रुपरेलिया याची कैरो, इजिप्त येथे होणाऱ्या व्हिक्टर बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनिअर टीम चॅम्पियनशिप २०२६ साठी भारतीय संघात निवड झाली आहे, तर कु. गाथा सूर्यवंशी हिने चीन येथे झालेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच राज्यस्तरावरही रायगडने आपली भक्कम उपस्थिती नोंदवली असून, रायगडच्या १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील मुलींच्या संघांनी महाराष्ट्राचे विद्यमान विजेतेपद कायम राखले आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी परेश ठाकूर सातत्याने कार्यरत असतात. खेळाडूंना आवश्यक सुविधा, योग्य व्यासपीठ आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी ते विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. तरुणांमध्ये क्रीडा संस्कृती रुजावी, त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा आणि परिसरातील खेळाडूंना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी संधी मिळावी, यासाठी त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. खेळाडूंच्या पाठीशी उभे राहणे, क्रीडा क्षेत्राला चालना देणे आणि नव्या पिढीला खेळाकडे वळवणे हीच परेश ठाकूर यांच्या कार्याची दिशा आहे. त्यामुळे परेश ठाकूर यांच्या महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनमधील नव्या जबाबदारीमुळे महाराष्ट्रतसेच रायगड जिल्ह्यात बॅडमिंटनच्या विकासाला आणखी चालना मिळणार आहे.

बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष म्हणून परेश ठाकूर यांनी उत्कृष्टपणे काम करताना रायगड जिल्ह्यातील तसेच पनवेल परिसरातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आणि त्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याचे सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर आता महाराष्ट्र उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ही बाब पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची आहे. पनवेल शहरात तब्बल १० कोर्टचे अत्याधुनिक बॅडमिंटन संकुल उभारण्यात येत आहे. तसेच पनवेलपासून खारघरपर्यंत विविध ठिकाणी बॅडमिंटनसाठी आवश्यक क्रीडा सुविधा आणि कोर्ट उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे स्थानिक खेळाडूंना सरावासाठी अधिक चांगल्या सुविधा मिळण्याबरोबरच त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळणार आहे. परेश ठाकूर यांनी रायगडमध्ये बॅडमिंटनच्या विकासासाठी केलेल्या कार्याला आता महाराष्ट्राच्या व्यापक पातळीवर काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीचा लाभ पनवेल, रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रातील बॅडमिंटन खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्राला होणार आहे.
— आमदार प्रशांत ठाकूर
माझ्यावर विश्वास व्यक्त करून साथ दिल्याबद्दल सर्व पदाधिकारी व सदस्यांचे मनःपूर्वक आभार !
महाराष्ट्रातील बॅडमिंटनच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच खेळाडूंना अधिक चांगल्या संधी, सुविधा आणि व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिकपणे व सातत्याने योगदान देण्याचा माझा सदैव प्रयत्न राहील. आपल्या विश्वासाला आणि अपेक्षांना न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. – परेश ठाकूर- उपाध्यक्ष, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन


Be First to Comment