Press "Enter" to skip to content

गणेश विसर्जन सेवेत कार्यरत घटकांचा गौरव, कामोठ्यात शेतकरी कामगार पक्षाचा उपक्रम; पुढील वर्षापासून पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृतीचा संकल्प


पनवेल, दि.२७ (वार्ताहर) : गणेश विसर्जनाच्या वेळी गणेशभक्तांना सेवा देणारे महानगरपालिका कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षक आणि सेवाभावी नागरिक यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे कामोठे शहर कार्याध्यक्ष गौरव पोरवाल यांच्या पुढाकाराने सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

कामोठे येथील शंकर मंदिर तलावाजवळील गणेश विसर्जन स्थळी झालेल्या या उपक्रमात शेतकरी कामगार पक्षाचे उपाध्यक्ष रमेश गोरे, सेक्टर १९ चे उपाध्यक्ष सचिन झांजणे, विद्यार्थी संघटनेचे रजनीश सिंह तसेच आशुतोष पोरवाल उपस्थित होते.

गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने विसर्जनस्थळी येतात. मात्र विसर्जन प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच विविध सेवाभावी घटक अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या योगदानाची दखल घेत या सर्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे, पर्यावरण विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी भामरे, कामोठे पोलीस ठाण्याच्या प्रभारी ज्योती देशमुख, मनोहर पगार, डीसीपी रश्मी नांदेडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
विसर्जन व्यवस्थेत योगदान देणारे नागरिक, महानगरपालिकेचे स्वच्छता कर्मचारी, सुरक्षा रक्षक तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. या वेळी बोलताना गौरव पोरवाल यांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून जनसेवेचे कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

गणेश विसर्जनासोबतच पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही नागरिकांनी स्वीकारावी, यासाठी पुढील वर्षापासून कामोठे परिसरातील विविध सोसायट्यांमध्ये जनजागृती करण्याचा संकल्प करण्यात आला. घरगुती गणेशमूर्तींचे शक्यतो सोसायटी परिसरात कृत्रिम किंवा घरगुती पद्धतीने विसर्जन करणे, निर्माल्य व इतर कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे याबाबत नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
तसेच पीओपीच्या मूर्तींऐवजी पर्यावरणपूरक मातीच्या मूर्तींचा वापर वाढविण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला जाणार आहे. धार्मिक श्रद्धा आणि परंपरा जपत पुढील पिढीसाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

“जिंकू किंवा हारू, पण जनतेची सेवा करणे हे आपले कर्तव्य आणि धर्म आहे,” अशी शिकवण आमदार बाळाराम पाटील देत असल्याचे सांगत, त्याच विचाराने जनसेवा, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचे कार्य पुढेही सुरू ठेवणार असल्याचे गौरव पोरवाल यांनी स्पष्ट केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.