Press "Enter" to skip to content

मोदकांनी जिंकली रसिकांची मने; ‘मॅड ओव्हर मोदक’मध्ये कल्पकतेचा गोड आविष्कार : सिनेअभिनेत्री धनश्री कडगावकर


पनवेल, दि.२७ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल येथील ओरायन मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅड ओव्हर मोदक’ या विशेष मोदक बनवण्याच्या स्पर्धेत स्पर्धकांनी आपल्या पाककौशल्यासोबतच सर्जनशीलतेचे अनोखे दर्शन घडवले. विविध आकार, रंग, सजावट आणि चवींच्या मोदकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, असे प्रतिपादन सिनेअभिनेत्री धनश्री कडगावकर यांनी केले.

गणेशोत्सव आणि मोदक यांचे अतूट नाते लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पारंपरिक उकडीच्या मोदकांपासून ते आकर्षक पद्धतीने सजवलेल्या नाविन्यपूर्ण मोदकांपर्यंत विविध प्रकार पाहायला मिळाले. प्रत्येक स्पर्धकाने मोदकाची चव, आकारमान, सजावट आणि सादरीकरण यामध्ये वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्पर्धेच्या ठिकाणी जणू मोदकांच्या रूपात कल्पकतेचीच मेजवानी पाहायला मिळाली.

स्पर्धेत वैष्णवी कोचरेकर यांनी प्रथम क्रमांक, शर्वरी सुतार यांनी द्वितीय क्रमांक, तर अंकिता देसाई यांनी तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच गणेशोत्सवातील पारंपरिक खाद्यसंस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

या कार्यक्रमाला अभिनेत्री आणि विशेष अतिथी धनश्री कडगावकर यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली. त्यांनी स्पर्धकांच्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या पाककौशल्याचे कौतुक केले. नागरिकांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत स्पर्धकांचा उत्साह वाढवला.

ओरायन मॉल, पनवेल हे शहरातील खरेदी, मनोरंजन आणि खाद्यसंस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र म्हणून नागरिकांमध्ये परिचित आहे. विविध ब्रँडची दुकाने, खाद्यपदार्थांची दालने, मनोरंजनाच्या सुविधा तसेच विविध सण-उत्सवांच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणारे उपक्रम यामुळे मॉलमध्ये वर्षभर नागरिकांची वर्दळ असते. खरेदीसोबतच कुटुंबीयांना मनोरंजन आणि विविध कार्यक्रमांचा अनुभव मिळावा, यासाठी मॉलच्या वतीने वेळोवेळी सांस्कृतिक, मनोरंजनात्मक आणि सणानिमित्त विशेष उपक्रम राबवले जातात.

गणेशोत्सवाच्या काळात आयोजित करण्यात आलेल्या ‘मॅड ओव्हर मोदक’ या उपक्रमामुळे पारंपरिक खाद्यपदार्थाला आधुनिक सादरीकरणाची जोड मिळाली. विशेषतः गृहिणी आणि पाककलेची आवड असलेल्या नागरिकांना आपले कौशल्य सादर करण्यासाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध झाले.

एम.पी. ग्रुप आणि ओरायन मॉल, पनवेल यांच्या सहकार्याने आयोजित या उपक्रमामागे गणेशोत्सवाचा उत्साह, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि नागरिकांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता. मोदक या पारंपरिक पदार्थाभोवती स्पर्धेची संकल्पना उभी करून त्याला मनोरंजनाची जोड देण्यात आली. त्यामुळे सहभागींसोबतच उपस्थित नागरिकांनाही या उपक्रमाचा आनंद घेता आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मॉलचे सेंटर हेड अग्नेलो फर्नांडिस, ऑपरेशन्स हेड सारिका हजारे आणि मार्केटिंग मॅनेजर श्रीयश्री नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्पर्धेचे नियोजन, सहभागींची व्यवस्था, कार्यक्रमाचे सादरीकरण आणि नागरिकांचा सहभाग यासाठी टीमने विशेष मेहनत घेतली. मॉलचे मालक मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

गणेशोत्सवातील भक्ती, परंपरा आणि खाद्यसंस्कृतीला आधुनिक मनोरंजनाची जोड देणाऱ्या या उपक्रमामुळे ‘मॅड ओव्हर मोदक’ स्पर्धेने पनवेलकरांच्या उत्सवातील गोडवा आणखी वाढवला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.