
लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंबईतील लालबागच्या राजाचे थेट दर्शन आता पनवेलकरांना घडणार आहे
पनवेल : पनवेलमधील महात्मा ज्योतिबा फुले हातगाडी संघटना व फळभाजी विक्रेते सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री गौरा गणेश उत्सवानिमित्त लालबागच्या राजाची हुबेहूब प्रतिकृती पनवेलमध्ये २९ सप्टेंबर २०२६ रोजी विराजमान होणार आहे. संघटनेच्या गौरा गणेश उत्सवाचे हे ३४ वे वर्ष असून सामाजिक बांधिलकी जोपासून हा उत्सव अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि शांततामय वातावरणात साजरा केला जात असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष एस. के. नाईक यांनी दिली आहे.
गेल्या ३३ वर्षांपासून हा उत्सव अविरतपणे साजरा केला जात असून संघटनेचे जवळपास तीन हजारांपेक्षा जास्त सभासद यात सक्रिय सहभागी असतात. यामध्ये छोटे-मोठे व्यवसाय करून आपले उदरनिर्वाह करणाऱ्या बांधवांचा मोठा सहभाग आहे. गणेशोत्सवाच्या काळात पनवेल तालुक्यातील भक्तांना लागणारे पूजेचे साहित्य विक्री करण्यात येथील छोटे व्यावसायिक व्यस्त असतात. त्यामुळे या दिवसांत त्यांना गणेशोत्सवाचा आनंद पुरेपूर घेता येत नाही. हीच बाब विचारात घेऊन सर्व सभासदांना एकत्र उत्सव साजरा करता यावा यासाठी ३३ वर्षांपूर्वी या गौरा गणेश उत्सवाची सुरुवात करण्यात आली होती.

मंगळवारी २९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजता महापौर, नितीन जयराम पाटील यांच्या हस्ते श्री गौरा गणेशपूजन होणार आहे. उत्सवाच्या सुरुवातीच्या काळात वेगवेगळ्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली जात होती, परंतु गेल्या २७ वर्षांपासून लालबागच्या राजाचीच हुबेहूब प्रतिकृती पनवेलमध्ये तयार करून तिची स्थापना केली जाते. लालबागच्या राजाची मूर्ती साकारणारे प्रसिद्ध मूर्तिकार संतोष कांबळी व त्यांचे सहकारी गेल्या १५ ते २० दिवसांपासून पनवेलमध्येच ही भव्य मूर्ती साकारण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत, तर मूर्तीचे धोतर सजवण्याचे कलात्मक काम रुपेश पवार करत आहेत. सर्व धर्मीय बांधव जात-पात आणि भेद विसरून अत्यंत एकदिलाने या उत्सवात सहभागी होतात. उत्सवादरम्यान भव्य महाप्रसादाचे आयोजन केले जाते, ज्याचा लाभ ७० हजारांपेक्षा जास्त भाविक घेतात. या ‘मार्केटच्या राजा’चे दर्शन घेण्यासाठी मुंबई, ठाणे, विरार, पालघर, नवी मुंबई तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तब्बल ५ लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात.
या गणेशोत्सवात विद्युत रोषणाई उत्तम प्रकारे असते.
ज्या भक्तांना मुंबईत लालबागच्या राजाचे दर्शन घेणे शक्य होत नाही किंवा ज्यांचे नवस पूर्ण झाले आहेत, ते भाविक मोठ्या श्रद्धेने पनवेलकडे धाव घेतात. रस्त्यावर हातगाडी लावून व्यवसाय करणाऱ्या बांधवांवर या राजाचे मोठे कृपाछत्र लाभले असून कालपर्यंत कष्ट करणारे सभासद आज प्रगती करत आहेत, ही सर्व राजाचीच कृपा असल्याचे सांगताना एस. के. नाईक भावुक झाले. दीड दिवसांच्या या सोहळ्यानंतर बुधवारी ३० सप्टेंबर २०२६ रोजी अत्यंत शाही थाटात आणि भावपूर्ण वातावरणात राजाचे विसर्जन होणार असल्याचे गौरा गणेश उत्सवाचे अध्यक्ष प्रल्हाद नाईक यांनी सांगितले.



Be First to Comment