
शेतात भला मोठा अजगर दिसताच गावकऱ्यांमध्ये खळबळ;सर्पमित्रांनी शिताफीने पकडून जंगलात सोडले
जळगाव (आनंद पवार) : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे शेत परिसरात दुपारी सुमारे १ वाजेच्या सुमारास भला मोठा सर्प आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली.शेतात एवढा मोठा साप दिसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तत्काळ सर्पमित्रांना पाचारण केले.
माहिती मिळताच सर्पमित्र विशाल बागुल,भावेश साळुंखे आणि अभय जयवंत पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी अत्यंत सावधगिरीने सर्पाचे निरीक्षण केले असता हा विषारी साप नसून तब्बल ८ ते ९ फूट लांबीचा अजगर असल्याचे स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या अजगराचे दर्शन होताच उपस्थित नागरिकांची काही काळ अक्षरशःबोबडी वळली.दरम्यान,सर्पमित्रांनी कोणतीही घाई किंवा धोकादायक हालचाल न करता अत्यंत काळजीपूर्वक अजगराला सुरक्षितरीत्या पकडले.त्यानंतर वनविभागाच्या वनरक्षक पुनम मॅडम तसेच नाना (प्रकाश) संदनशीव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सदर अजगराला नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगल परिसरात सुखरूप सोडण्यात आले.अजगर बिनविषारी असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
सर्पमित्रांनी दाखविलेली समयसूचकता,धाडस आणि वन्यजीवांप्रती असलेली संवेदनशीलता यामुळे अजगराचे प्राण वाचले असून,त्याला कोणतीही इजा न करता पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.मानव–वन्यजीव संघर्ष टाळत वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सर्पमित्रांनी केलेल्या या कार्याचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे. साप दिसला तर घाबरू नका,त्याला मारू नका;तज्ज्ञ सर्पमित्रांना माहिती द्या,असा संदेशही या घटनेतून अधोरेखित झाला आहे.



Be First to Comment