


काळुंद्रे (प्रतिनिधी): काळुंद्रे गावातील नारायण आबाजी कांडपिळे यांच्या एकत्र कुटुंबात १०० वर्षांपासून चालत आलेली गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा यावर्षीही अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरी होत आहे. निसर्गाचा समतोल राखत परंपरा जपणारा कांडपिळे परिवार दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक उत्सवाचा आदर्श वस्तुपाठ ठरला आहे.
कांडपिळे कुटुंबाची ही शतकोत्तरी परंपरा निसर्गाशी घट्ट जोडलेली आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पद्धतीनुसार घरात स्थापन केली जाणारी गणेशमूर्ती ही पूर्णपणे शाडूच्या मातीपासून तयार केली जाते, तर गौरी मातेची मूर्ती तेरड्याच्या झाडापासून घडवली जाते. निसर्गाला साजेशा आणि पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या या मूर्ती भक्तांचे विशेष लक्ष वेधून घेतात.
या १०० वर्षांच्या ऐतिहासिक परंपरेचे औचित्य साधून कांडपिळे परिवाराच्या वतीने यंदा अत्यंत देखणा आणि भक्तिमय “उज्जैनचा महाकाल आणि प्रसिद्ध भस्म आरती” हा भव्य देखावा सादर करण्यात आला आहे. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातील भस्म आरतीचा जिवंत अनुभव देणारा हा देखावा पाहण्यासाठी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
एकत्र कुटुंब पद्धती टिकवून ठेवत निसर्गपूरक गणेशोत्सव साजरा करणारा कांडपिळे परिवार संपूर्ण परिसरासाठी एक प्रेरणास्थान बनला आहे.



Be First to Comment