

कामोठे : गणेशोत्सव म्हणजे केवळ उत्सव नाही, तर भक्ती, संस्कृती आणि समाजाला दिशा देणारे माध्यम… याच विचारातून शंभो मित्र मंडळ, कामोठे यांनी यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी एक आगळावेगळा संकल्प केला आहे. पनवेल नगरीत प्रथमच ‘प्रति श्री मार्तंड जेजुरी’ ची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून, ‘कामोठ्याचा महाराजा’*च्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना जेजुरीच्या भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.
यंदाच्या उत्सवाचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘चलचित्रगाथा – पुष्प दुसरे’. आजच्या बदलत्या जीवनशैलीत हरवत चाललेली संस्कृती, परंपरा, संस्कार आणि आपल्या मुळांशी असलेले नाते यावर भाष्य करणाऱ्या या चलचित्रातून समाजाला एक नवीन विचार आणि दिशा देण्याचा प्रयत्न मंडळाने केला आहे.

उत्सवाची रंगत वाढविण्यासाठी मंडळाच्या वतीने ‘१२ दिवस, १२ विविध कार्यक्रम’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. पारंपरिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच सामाजिक उपक्रम आणि विविध स्पर्धांच्या माध्यमातून लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना सहभागी करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेषतः पारंपरिक जागरण-गोंधळासह विविध सांस्कृतिक उपक्रमांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे.
भक्ती जेजुरीची…
परंपरा आपल्या मातीची…
आणि विचार समाजाच्या उद्याचा!
अशा या भक्ती, संस्कृती आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम असलेल्या शंभो मित्र मंडळ, कामोठ्याचा महाराजा गणेशभक्तांसाठी यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे.
यंदाच्या ‘१२ दिवस, १२ विविध कार्यक्रम’ या उपक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे विविध स्पर्धांसाठी तब्बल ₹२,२२,२२२/- इतक्या एकूण रकमेची भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या उत्साहासोबतच स्पर्धकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.



Be First to Comment