Press "Enter" to skip to content

गणेशोत्सवात जागृती पीपल्स असोसिएशन व अष्टविनायक मित्र मंडळाची सामाजिक बांधिलकी

पनवेल (प्रतिनिधी) नवीन पनवेल येथील सेक्टर ८ मधील जागृती पीपल्स असोसिएशन व अष्टविनायक मित्र मंडळच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दहा दिवसांचा गणेशोत्सव (पनवेलचा विघ्नहर्ता) विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता त्यातून समाजोपयोगी उपक्रमांना चालना मिळावी, या उद्देशाने मंडळाच्यावतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.

          या आरोग्य शिबिरामध्ये परिसरातील नागरिकांची विविध प्रकारची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच आरोग्यविषयक समस्या, आजारांपासून बचाव, नियमित आरोग्य तपासणी आणि निरोगी जीवनशैली याबाबत नागरिकांना आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात मंडळाच्यावतीने धार्मिक कार्यक्रमांसोबतचसामाजिक उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात येत असून, समाजातील गरजू घटकांना मदत करणे, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे आणि सामाजिक एकोपा वृद्धिंगत करणे यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. अष्टविनायक मित्र मंडळाच्या या उपक्रमातून ‘उत्सवातून समाजसेवा’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न होत असून, गणरायाच्या उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यात आली आहे. मंडळाच्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.