
गायक मंगेश चौधरी व अक्षय चौधरी यांच्या सुरांनी रंगला विठ्ठलनामाचा गजर
पनवेल (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाराष्ट्र शासन स्थापित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित भक्तिमय भजनसेवेत रायगडचे सुपुत्र तथा सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक पं. उमेश चौधरी यांचे चिरंजीव आणि भजनसम्राट ह. भ. प. निवृत्तीबुवा चौधरी यांचे नातू गायक मंगेश चौधरी आणि अक्षय चौधरी यांनी आपल्या सुरेल गायनातून श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी स्वरसेवा अर्पण केली. अभंग, भजन आणि भक्तिगीतांच्या सुमधुर सादरीकरणाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभारा मंडपात दुपारी १ ते ३ या वेळेत झालेल्या या विशेष भजनसेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गायक बंधू मंगेश चौधरी आणि अक्षय चौधरी यांच्या भक्तिगीत व अभंगांच्या सादरीकरणाने उपस्थित हजारो वारकरी, भाविक आणि संगीतप्रेमी तल्लीन झाले. या स्वरसेवेला पेण-अलिबागचे पखवाज वादक ओंकार म्हात्रे यांनी पखवाजाची साथ दिली. तसेच सुनील म्हात्रे यांनी तबल्यावर, तर प्रकाश म्हात्रे आणि वर्षा म्हात्रे यांनी टाळांवर साथ करत कार्यक्रमाला सुरेल रंगत आणली. गायन आणि वाद्यसंगतीच्या सुंदर मिलाफामुळे संपूर्ण मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
पंढरपूरच्या पावन भूमीत, विठुरायाच्या साक्षीने आणि रुक्मिणी मातेच्या कृपाछायेत झालेल्या या स्वरसेवेदरम्यान ‘विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला. भक्तिरसपूर्ण अभंग आणि भजनांच्या सादरीकरणाने वारकरी व भाविक भावविभोर झाले. उपस्थितांनी या भजनसेवेचा मनमुराद आनंद घेत विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत दर्शन घेतले. “श्री विठूरायाच्या चरणी गायन सेवा रुजू करण्याची संधी मिळणे, हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भाग्याचा आणि अलौकिक क्षण आहे,” अशी भावना मंगेश व अक्षय चौधरी या बंधूनी व्यक्त केली. या भक्तीमय कार्यक्रमास अनेक संगीतसाधक, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. स्वरांनी सजलेली ही गायन सेवा उपस्थितांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील अशीच ठरली. रायगड आणि नवी मुंबईच्या मातीतून संगीतसेवेची परंपरा पुढे नेणाऱ्या या कलाकारांना पंढरपूरच्या पावन नगरीत विठ्ठलाच्या चरणी आपली कला अर्पण करण्याची संधी मिळणे हा आनंदाचा आणि समाधानाचा क्षण असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भक्ती, शास्त्रीय संगीत, अभंग आणि नामस्मरणाचा सुरेल संगम घडवून आणणारी ही स्वरसेवा उपस्थित भाविकांच्या स्मरणात राहिली.


Be First to Comment