Press "Enter" to skip to content

रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित

रोहा : समीर बामुगडे

श्री गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा’ यांच्या वतीने, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रात व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. अवघ्या तीन तासांत श्री सदस्यांनी रोहा शहर आणि परिसराचा कायापालट केला.

या मोहिमेअंतर्गत रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रातील मध्यवर्ती बसस्थानक, रेल्वे स्टेशन परिसर, शहरातील प्रमुख व उपरस्ते, तसेच रोह्याला जोडणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांची सखोल साफसफाई करण्यात आली. प्रतिष्ठानच्या शिस्तबद्ध नियोजन आणि सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वांनुसार ही मोहीम राबवली गेली.

या स्वच्छता अभियानामध्ये प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांसह स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कडक शिस्त आणि सेवाभावी वृत्ती जपत एकूण ४२१ श्री सदस्यांनी या श्रमदानात प्रत्यक्ष भाग घेतला. अवघ्या तीन तासांच्या कालावधीत संपूर्ण परिसरातून तब्बल २७ टन कचरा जमा करण्यात आला. संकलित केलेला सर्व कचरा योग्य प्रकारे वाहनांद्वारे डंपिंग ग्राऊंडवर पोहोचवण्यात आला.

सामाजिक आरोग्याचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात विविध क्षेत्रांतील २८ सरकारी पदाधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक मान्यवरांनी उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले. यामध्ये रोहा अष्टमी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा कु. वनश्री समीर शेडगे, उपनगराध्यक्ष श्री. अहमदशेठ दर्जी, ज्येष्ठ नगरसेवक श्री. मयूर दिवेकर, नगरसेविका सौ. सुप्रिया अनंत जाधव आणि माजी नगरसेवक श्री. जितेंद्र पडवळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय, रोहा एस. टी. डेपो व्यवस्थापक श्री. सुनील सिताराम शेडगे, रोहा रेल्वे स्टेशन व्यवस्थापक श्री. एल. एन. ठाकूर, तसेच नगरपालिका अधिकारी श्री. श्रीनिवास पाटील व श्री. पोळेकर यांनीही उपस्थित राहून प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे कौतुक केले आणि संपूर्ण सहकार्य दिले.
गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रतिष्ठानने राबविलेल्या या मोहिमेमुळे रोहा शहर स्वच्छ आणि सुंदर झाले असून, स्थानिक नागरिकांमधून प्रतिष्ठान व सर्व श्री सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले जात आहेत.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.