Press "Enter" to skip to content

श्रावणाच्या साजाला फॅशनचा तडका; ‘द रॉयल-श्रावण व्होग’मध्ये कलागुणांचा जल्लोष

पनवेल : गार्गीज् ग्रुप आयोजित आणि आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठान, रंगनील क्रिएशन्स तसेच इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी, न्यू पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘द रॉयल-श्रावण व्होग, पनवेल फॅशन वीक सीझन-३, २०२६’ हा भव्य फॅशन सोहळा सोमवार, दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह, पनवेल येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. श्रावणाच्या पारंपरिक साजाला आधुनिक फॅशनची जोड देत फॅशन, आत्मविश्वास, टॅलेंट, ग्लॅमर आणि स्टाईलचा सुरेख संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मातृछाया प्री-प्रायमरी स्कूल, आकुर्ली येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुंदर गणेश वंदनेने कार्यक्रमाला भक्तिमय प्रारंभ झाला. सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली, तर शाळेलाही ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.

यंदाच्या फॅशन वीकमध्ये किड्स, मिस, मिसेस आणि मिस्टर अशा विविध गटांमध्ये फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. किड्स कॅटेगरी ‘अ’मध्ये प्रियांशी शरद शेलके, तर कॅटेगरी ‘ब’मध्ये समर्थ स्मिता संतोष चव्हाण यांनी विजेतेपद मिळवले. मिसेस कॅटेगरीमध्ये सौ. श्रुती गुप्ता, मिस कॅटेगरीमध्ये कुमारी पल्लवी पाटील, मिस्टर कॅटेगरीमध्ये श्री. सोहम पाटील यांनी विजेतेपद पटकावले. मेकअप आर्टिस्ट स्पर्धेत सौ. स्नेहा कुंभार विजेत्या ठरल्या.

फॅशनसोबतच बालकलाकारांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी आयोजित ‘लिटल आर्टिस्ट ड्रॉइंग कॉम्पिटिशन-२०२६’ मध्ये ग्रुप ‘अ’मधून ओजस अमोल साळे, ग्रुप ‘ब’मधून गायत्री उन्नीथन, तर अ‍ॅडल्ट गटातून मयुरी अमोल साळे यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेचे परीक्षण सौ. नीता कोटक यांनी केले.

फॅशन स्पर्धेचे परीक्षण तेजस पाटील – Eks09 Studio, महेंद्र – स्वरूप सलून आणि महिमा खरे – फॅशन डिझाईन विभाग प्रमुख, NIF ग्लोबल पनवेल यांनी केले. स्पर्धकांनी आत्मविश्वासाने आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची दाद मिळवली. नवोदित कलाकार, मॉडेल्स, मेकअप आर्टिस्ट आणि बालकलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हा उपक्रम विशेष ठरला,कार्यक्रमाचे अँकर मधु मनोज जाजू यांनी मार्मिक केले

गार्गीज ग्रुपच्या फाउंडर सौ. रश्मी मोरे यांनी मनोगतात कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, महिलांसाठी नेहमीच विविध आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा गार्गीज ग्रुपचा प्रयत्न असतो. यंदा पारंपरिक श्रावण थीमपेक्षा ‘Create Your Own Style’ ही संकल्पना घेऊन प्रत्येकाच्या कल्पकतेला, विचारांना आणि स्वतःच्या शैलीला व्यासपीठ देण्यात आले. मेकअप आर्टिस्टना त्यांची कला, कौशल्य आणि व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी स्वतंत्र व्यासपीठ देण्यात आले. तसेच प्रथमच लहानग्यांना सहभागी करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा आणि फॅशन शो आयोजित करण्यात आला. मुलांना अभ्यासातून थोडा विरंगुळा मिळावा, त्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे सौ. रश्मी मोरे यांनी मनःपूर्वक आभार मानले. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे विशेष आभार मानताना रंगनील क्रिएशन्सच्या प्रोड्यूसर सौ. कल्पना विलास कोठारी यांनी दिलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल आणि भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी, न्यू पनवेलच्या प्रेसिडेंट सौ. ममता राजीवन तसेच नगरसेविका सौ. स्नेहल ढमाले पाटील,मोहिनी ताई, आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मोलाच्या योगदानाबद्दलही त्यांनी विशेष आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या गार्गीज ग्रुपच्या मॅनेजमेंट टीम तसेच इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी, न्यू पनवेलच्या सर्व सदस्यांचेही त्यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची उंची, दर्जा आणि व्यावसायिकता वाढविण्यासाठी लाभलेले ग्रुमिंग पार्टनर किरण राजपूत व देवदत्त घरत यांच्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच संपूर्ण कार्यक्रमाची माहिती, उत्साह आणि भव्यता मान्यवर तसेच प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची जबाबदारी मधु जाजू आणि किरण राजपूत यांनी सुंदररीत्या पार पाडल्याबद्दल त्यांचेही विशेष आभार मानण्यात आले. कार्यक्रमाच्या यशामागे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे योगदान अमूल्य असल्याचे रश्मी मोरे यांनी नमूद केले.

विजेत्यांचा सन्मानही आकर्षक पद्धतीने करण्यात आला. सर्व प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना क्राऊन, सॅश, प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि सिल्व्हर फ्रेम देण्यात आली. उपविजेते आणि विविध टायटल्सच्या विजेत्यांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व सिल्व्हर फ्रेम देऊन गौरविण्यात आले. आमदार विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली, तर लहान वयोगटातील विजेत्यांना त्यांच्या उपयोगी वस्तू बक्षिसांच्या स्वरूपात देण्यात आल्या.

कार्यक्रमाला सहकार्य करणाऱ्या संस्थांनीही विजेत्यांचा उत्साह वाढविला. चंदूकाका सराफ यांच्या वतीने विजेत्या श्रावण क्वीनला सोन्याची नथ, विजेत्या टायटल्सना सिल्व्हर फ्रेम, तर लकी ड्रॉमध्ये प्रेक्षकांना सिल्व्हर कॉईन देण्यात आला. द्वारकादास शामकुमार, पनवेल यांच्या वतीने मिस, मिसेस आणि श्रावण क्वीन विजेत्यांना पैठणी साड्या तसेच लकी ड्रॉमधील प्रेक्षकांना साड्या भेट देण्यात आल्या. स्वरूप सलूनच्या वतीने विजेत्यांना सलून व्हाऊचर्स देण्यात आले.

Eks09 Studio हे क्रिएटिव्ह ऑपॉर्च्युनिटी पार्टनर म्हणून सहभागी झाले असून विजेत्यांना शॉर्ट फिल्म आणि म्युझिक अल्बममध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली. NIF ग्लोबल पनवेल तसेच फ्रँकलिन इन्स्टिट्यूट ऑफ एअर होस्टेस ट्रेनिंग, पनवेल यांच्या वतीनेही विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.

विशेष म्हणजे इनरव्हील क्लब ऑफ गॅलेक्सी, न्यू पनवेल यांच्या वतीने ‘कन्सोलेशन’मध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये दोन याप्रमाणे एकूण नऊ सिल्व्हर कॉईन्स बहाल करण्यात आले. त्यामुळे विजेत्यांसोबतच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांचाही उत्साह वाढला.

कार्यक्रमास नगरसेविका स्नेहल ढमाले -पाटील, मोहिनी विक्रांत पाटील आणि छायाताई बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विशेष अतिथी म्हणून डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे, डॉ. जया गुर्साळे, डॉ. जयश्री पाटील, डॉ. केतकी पाटील म्हस्के,माधुरी गोसावी आणि सौ. राजश्री सोनी उपस्थित होत्या.

मोफत प्रवेशासोबतच प्रेक्षकांसाठी विविध आकर्षक बक्षिसे आणि सरप्राईजेस ठेवण्यात आल्याने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावणाच्या सांस्कृतिक परंपरेला आधुनिक फॅशनची जोड, नवोदितांना आपल्या कलागुणांचे व्यासपीठ, विजेत्यांना सन्मान आणि प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी देणारा ‘द रॉयल-श्रावण व्होग पनवेल फॅशन वीक सीझन-३’ हा सोहळा पनवेलच्या सांस्कृतिक आणि फॅशन विश्वात संस्मरणीय ठरला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.