Press "Enter" to skip to content

गणेशोत्सवात वाहतुकीचे नियोजन; अतिक्रमण हटविण्यासाठी वाहतूक पोलिस रस्त्यावर


पनवेल बाजारपेठेत कोंडी टाळण्यासाठी विविध मार्गांवर निर्बंध; ७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात

पनवेल, दि. १२ (वार्ताहर) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरातील बाजारपेठेत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. नागरिकांनी रस्त्यावर वाहने उभी न करता प्रशासनाने निश्चित केलेल्या वाहनतळांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, रस्त्याकडेला असलेली फुले व पालेभाजी विक्रेत्यांची अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारी महापालिकेची असतानाही वाहतूक पोलिसांनाच रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागल्याचे चित्र दिसून आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, महापालिका, लोकप्रतिनिधी आणि गणेशोत्सव मंडळांच्या समन्वयातून वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. फडके नाट्यगृहासमोरील मराठी शाळा, नवीन तहसील कार्यालय, टपाल नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील व समोरील जागा, कर्नाळा सर्कलजवळील जागा, लाईन आळी रोडवरील विलास कोठारी यांच्या जागेतील परिसर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागील डी.एड. कॉलेजसमोरील मोकळी जागा वाहनतळासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.

मात्र, यापैकी काही जागांची अद्याप महापालिकेकडून स्वच्छता करण्यात आलेली नसल्याने तात्पुरत्या वाहनतळाची व्यवस्था प्रत्यक्षात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. गर्दीनुसार एकेरी वाहतूक, सम-विषम पार्किंग आणि बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. उरण नाका ते टपाल नाका परिसरातील व्यापाऱ्यांसाठी जड व अवजड वाहनांमधून माल चढ-उतार करण्यासाठी दुपारी १ ते ४ ही वेळ निश्चित करण्यात आली आहे.

अतिक्रमण हटविण्याची जबाबदारी महापालिकेची पनवेल बाजारपेठेतील रस्ते व पदपथांवरील अतिक्रमणे, कचरा तसेच रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेले साहित्य हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. शुक्रवारी वाहतूक पोलिसांनी याबाबत कारवाई सुरू केली. ही बाब महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त महेशकुमार मेघमाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने प्रभाग अधिकाऱ्यांना पथक पाठवून कारवाईचे आदेश दिले.
महापालिकेने वेळीच अतिक्रमणे हटवून वाहनतळाच्या जागा उपलब्ध करून न दिल्यास वाहतूक नियोजन केवळ बैठकीपुरतेच मर्यादित राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

७० कर्मचारी, सात अधिकारी तैनात
गणेशोत्सव बंदोबस्तासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे ७० कर्मचारी आणि सात अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच पनवेल महापालिकेकडे नवी मुंबई पोलिसांनी अतिरिक्त ५० वॉर्डनची मागणी केली आहे.

“गणेशोत्सवात वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मी स्वतः आणि माझे कर्मचारी रस्त्यावर उतरून कारवाई करत आहोत. नागरिकांनी रस्त्यावर वाहने न उभी करता प्रशासनाने निश्चित केलेल्या पार्किंगच्या ठिकाणांचाच वापर करावा. वाहतूक कोंडीमुक्त गणेशोत्सवासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून वाहतूक नियमांचे पालन करावे,” असे आवाहन सुभाष पुजारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पनवेल शहर वाहतूक शाखा यांनी केले.

प्रमुख मार्गांवर वाहतूक निर्बंध
उरण नाका ते टपाल नाका मार्गावर रिक्षा आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असून ही वाहने उरण नाका–पंचरत्न सर्कलमार्गे वळविण्यात येणार आहेत. तसेच फुल मार्केट ते पोलीस चौकी–पटेल हॉस्पिटल मार्ग आणि कर्नाळा फुल मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

गणेशोत्सव काळात बाजारपेठेतील गर्दी कमी करण्यासाठी रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फूल व पालेभाजी विक्रेत्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कर्नाळा फुल मार्केट ते कर्मवीर भाऊराव चौक हा मार्ग बंद करून त्या जागेचा वापर विक्रेत्यांसाठी करण्यात येणार आहे. गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना टाळण्यासाठीही हे नियोजन करण्यात आल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.

यावेळी शहरातील वाहतूक कोंडी संदर्भात ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण (नगरसेवक तथा महानगरप्रमुख), पराग मोहिते (युवासेना लोकसभा अध्यक्ष), प्रसाद सोनावणे (शहरप्रमुख), अभिजीत साखरे (शहर संघटक), शैलेश जगनाडे (उपशहरप्रमुख), जय कुष्टे (युवासेना विधानसभा अध्यक्ष), धिरज निंबाळकर, सिद्धेश पवार आणि कौस्तुभ सोमण यांनी वाहतूक शाखेचे वपोनि सुभाष पुजारी यांच्या सोबत ठिकठिकाणी जाऊन पाहणी केली व वाहतुकीचे नियोजन केले.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.