Press "Enter" to skip to content

पिल्लाच्या विरहाने माकडीनेही सोडले प्राण ! २०-२५ दिवसांच्या पिल्लाच्या मृत्यूनंतर अन्न-पाण्याचा त्याग

शिरसोदेत माणुसकीचा हृदयस्पर्शी प्रत्यय-अजय भिल यांनी नातेवाईकाप्रमाणे केले अंतिम संस्कार

जळगाव (आनंद पवार)

आई आणि लेकराच्या नात्याची वीण केवळ माणसांमध्येच असते असे नाही,याचा हृदय पिळवटून टाकणारा प्रत्यय पारोळा तालुक्यातील शिरसोदे येथे आला.अवघ्या २० ते २५ दिवसांपूर्वी जन्मलेल्या आपल्या पिल्लाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर माकडीने अन्न-पाण्याचा त्याग केला आणि अखेर शुक्रवार दि.११ सप्टेंबर रोजी तिनेही प्राण सोडले.या घटनेने शिरसोदे परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत असून,मुक्या प्राण्याच्या दुःखात सहभागी होत ग्रामस्थांनी माणुसकीचे दर्शन घडविले.

शिरसोदे येथील जिल्हा परिषद शाळेजवळ ही माकडी आपल्या पिल्लासह परिसरात वावरत होती.सुमारे २० ते २५ दिवसांपूर्वी तिने एका पिल्लाला जन्म दिला होता.मात्र दुर्दैवाने पिल्लू खाली पडले.त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी त्याला चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आणि उपचाराअभावी त्याचा मृत्यू झाला.आपले पिल्लू मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर माकडीने जणू लेकराच्या विरहाचा जबर धक्का घेतला.तिने अन्न-पाण्याचा त्याग केला.ग्रामस्थांनी तिच्यासाठी खाण्यापिण्याची व्यवस्था करून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला;मात्र पिल्लाच्या विरहातून ती सावरली नाही.अखेर शुक्रवारी तिचीही प्राणज्योत मालवली.

या घटनेची वार्ता परिसरात पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली.घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.पारोळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी छत्रपती चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोंढाळे येथील वनपाल रोशनी भगवान पवार,वनरक्षक पूनम जितेंद्र पवार,संरक्षण मजूर नानासाहेब(प्रकाश) संदानशिव,रवींद्र गायकवाड,विपुल पवार,लोटन भिल आदी कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.वनविभागाने शिरसोदे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. करिष्मा तडवी यांच्याशी संपर्क साधला.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी येऊन माकडीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देण्यात आला.

अंत्ययात्रेत महिलांसह ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

शिरसोदे जिल्हा परिषद शाळेजवळून माकडीच्या मृतदेहाची अंत्ययात्रा काढण्यात आली.यावेळी महिला,प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.माकडीचा मृतदेह ऑटो रिक्षातून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी नेण्यात आला.मुक्या प्राण्याच्या दुःखात सहभागी होत ग्रामस्थांनी अत्यंत भावपूर्ण वातावरणात तिला अखेरचा निरोप दिला.या अंत्ययात्रेत सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक बंडू पाटील,महिला पोलीस पाटील सीमा बळवंत पाटील,विनोद ठाकरे (भिल),गोरख शंकर पाटील,प्रशांत संभाजी पाटील,दिगंबर सोनार,मंगलाबाई महाजन,भटाबाई पाटील,संगीता सुनील पाटील,पुष्पाबाई विलास पाटील,निर्मलाबाई दिलीप पाटील,हिरकनबाई भील, जिजाबाई सुभाष महाजन,बेबाबाई गोरख महाजन, सुमनबाई भील, भारत लोटन पावनकर,सीमा गणेश महाजन यांच्यासह असंख्य महिला,ज्येष्ठ नागरिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

अजय भिल यांनी नातेवाईकाप्रमाणे केले अंतिम संस्कार

या संपूर्ण घटनेत अजय संजय भिल या तरुणाने माणुसकीचे अनोखे उदाहरण घालून दिले. कुटुंबातील एखाद्या सदस्याप्रमाणे त्याने या माकडीच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली.एवढेच नव्हे तर या दुःखद घटनेत सहभागी होत त्याने स्वतःचे मुंडन करून माकडीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.अजय भिल यांच्या या कृतीचे उपस्थित ग्रामस्थांनी कौतुक केले.

पिल्लाच्या विरहाचा तिला प्रचंड धक्का बसला

डॉ.करिष्मा तडवी, पशुवैद्यकीय अधिकारी, शिरसोदे यांनी सांगितले की,२० ते २५ दिवसांचे पिल्लू अचानक आपल्याला सोडून गेल्याने त्याच्या आईला प्रचंड मानसिक धक्का बसला असावा.पिल्लू गेल्यानंतर माकडी अन्नत्याग करून बसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.अखेर शुक्रवारी तिनेही देहत्याग केला.”

पिल्लाच्या मृत्यूनंतर आई माकडीने अन्न-पाण्याचा त्याग करून अखेरचा श्वास घेतल्याची ही घटना आईच्या ममतेला प्रजातींच्या सीमा नसतात,हे अधोरेखित करणारी ठरली आहे.शिरसोदे ग्रामस्थांनी एका मुक्या जीवाला दिलेला हा अखेरचा निरोप परिसरात चर्चेचा विषय ठरला असून,घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.