Press "Enter" to skip to content

गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी


पनवेल, दि.३ (संजय कदम) : नवीमुंबई पोलीस आयुक्तालय मार्फत अंतर्गत अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या असून त्यामध्ये गुन्हे शाखा कक्ष ३ पनवेल वपोनिपदी औदुंबर पाटील तर पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी सुभाष पुजारी यांनी आज पदभार स्वीकारला आहे.

यापूर्वी पनवेल शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकपदी औदुंबर पाटील हे कार्यरत होते व त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा पनवेलमध्ये उमटविला होता. त्यांनी शहरातील वाढती वाहतूक कोंडी, रस्त्यांच्या दुतर्फा होणारे अनधिकृत पार्किंग, वाहतूक नियमांचे उल्लंघन, बेशिस्त रिक्षा पार्किंग आणि अनधिकृत रिक्षा थांबे या समस्यांवर नियंत्रण ठेवण्याचे मोठे काम केले होते. तर आता नव्याने पदभार स्वीकारणारे सुभाष पुजारी यांना सुद्धा पनवेल व परिसराचा दांडगा अनुभव असून त्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, मुंबई पुणे वाहतूक शाखा आदी ठिकाणी यापूर्वी काम केले आहे.

याबरोबरच त्यांनी पोलीस सेवेसोबत शरीरसौष्ठवाची आवड जोपासत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्याने विविध शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. त्यांच्या क्रीडा कारकिर्दीत ‘मिस्टर वर्ल्ड’ स्पर्धेत सहा वेळा, ‘मिस्टर एशिया’ स्पर्धेत पाच वेळा आणि ‘मिस्टर इंडिया’ स्पर्धेत पाच वेळा विजेतेपद मिळवल्याची माहिती आहे. तसेच राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्येही त्यांनी पदके मिळवली आहेत. त्यांचा पोलीस सेवेचा प्रवास २०११ ते २०१८ या कालावधीत नवी मुंबई पोलीस, पनवेल तालुका, गुन्हे शाखा तसेच उरण आणि नेरुळ पोलीस ठाण्यातून झाला. त्यानंतर २०१९ ते २०२२ या कालावधीत त्यांनी पळस्पे हायवे वाहतूक विभागात सेवा बजावली. २०२३ मध्ये मुंबई शहर पोलीस दलात कार्यरत असताना त्यांनी मानखुर्द आणि मरोळ येथे सेवा बजावली. २०२४ ते २०२६ या कालावधीत डायल ११२ आणि महापे येथे त्यांनी सेवा बजावली. पोलीस सेवेत कार्यरत असतानाच त्यांनी शरीरसौष्ठवाचा सराव कायम ठेवत विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधील त्यांच्या कामगिरीमुळे त्यांनी पोलीस दलासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.