


गणेशोत्सवापूर्वी पंचायत समितीच्या विविध विभागाची आढावा बैठक
पेण, ता. ३ (वार्ताहर) : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय शाळांना विशेष निधी प्राप्त करून दिला असल्याने पेण तालुक्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा नीटनेटक्या ठेवाव्यात याव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक दृष्ट्या शाळेची अडचण भासणार नाही याची तात्काळ दक्षता घ्यावी असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला दिले आहेत.
रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या माध्यमातून गणेशोत्सवापूर्वी पेण तालुक्यातील विविध विभागाची आढावा बैठक दि. ३ रोजी परशराम बाग येथे घेण्यात आली.या बैठकीला जिप.सभापती वैकुंठ पाटील पंस. सभापती स्मिता पाटील, उपसभापती संजय डंगर, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, जिप.सदस्य प्रभाकर म्हात्रे, जनार्दन भस्मा, सुशांत खाकर, विवेक म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, जोमा दरवडा अदिंसह ग्रामविस्तार अधिकारी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग कर्मचारी, आशा वर्कर तसेच विविध विभागातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी ते अधिक म्हणाले कोणत्याही बाबतीत पेण तालुका कमी पडता कामा नये येथील शाळा, अंगणवाड्या, ग्रामपंचायत कार्यालय तसेच इतरही कामे विविध योजनांच्या माध्यमातून पूर्ण करून घ्याव्यात आणि गणेशोत्सवापूर्वी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीने स्वच्छता अभियान राबवावे असे आदेश सभापती वैकुंठ पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. तर शाळांना स्वयंपाक करणाऱ्या महिलांना मानधन कमी मिळत असल्याने त्यांचे कुटुंब चालविणे जिकिरीचे झाले आहे त्यामुळे त्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी मागणी जोमा दरवडा यांनी या आढावा बैठकीदरम्यान केली.यावेळी ग्रामपंचायत मध्ये चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


Be First to Comment