
पनवेल, दि.३१ ( वार्ताहर) : मालवाहतुकीसाठी देण्यात आलेल्या तब्बल ४८ लाख ६० हजार रुपये किमतीच्या हायवा डंपरचा अपहार करून तो परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राजेश्वर (सचिन) दिपकराव जाधव, रा. ठाणे, याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजीत भूपाल पवार (वय ३८, व्यवसाय ट्रान्सपोर्ट) यांच्या मालकीचा टाटा कंपनीचा एमएच ११ सी ५०७५ क्रमांकाचा हायवा टिपर आहे. सदर वाहन खडी व क्रश सँड वाहतुकीच्या कामासाठी आरोपी राजेश्वर जाधव याच्याकडे देण्यात आले होते.
नूर पार्किंग, गव्हाण फाटा, पनवेल येथे वाहन असल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर फिर्यादी यांच्या कोणत्याही परवानगीशिवाय वाहन नवी मुंबई परिसरातून परस्पर हलवून त्याचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे.
आरोपीने वाहनाबाबत फिर्यादी यांना कोणतीही कल्पना न देता ते परस्पर विकण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. वपोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत, पोहवा अतुल दिवेकर, अविनाश गंथडे, पोशी ठोंबरे, काकड आदींच्या पथकाने तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या आधारे अधिक शोध घेतला असता सदर डंपर हा मध्य प्रदेश येथील सेंधवा येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने तो डंपर ताब्यात घेण्यात आला. तर आरोपी राजेश्वर (सचिन) दिपकराव जाधव ठाणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे.


Be First to Comment