
पनवेल, दि.३१ ( वार्ताहर) : सामाजिक बांधिलकी जपत केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने कृषीव मोहनिष भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ उत्सवापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू, वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आला.
या उपक्रमांतर्गत १०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक रेशन साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणात अडचणी येणाऱ्या १०० शालेय विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन किट आणि आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय २०० महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांच्या प्रती सन्मान आणि आपुलकी व्यक्त करण्यात आली.
गरजू कुटुंबांना दैनंदिन जीवनासाठी आधार मिळावा, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे आणि महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. फाउंडेशनच्या या उपक्रमाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून, आपल्या आनंदात समाजातील गरजू घटकांना सहभागी करून घेण्याची संधी आहे. समाजासाठी काहीतरी देण्याची भावना प्रत्येकामध्ये निर्माण व्हावी, यासाठी अशा सामाजिक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देणे आवश्यक आहे,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या सामाजिक उपक्रमासाठी अनंत शंकर भोईर, दयानंद भोईर, ममता म्हात्रे, कोमल मोहनिष भोईर, मोहनिष अनंत भोईर, अतुल भोईर, राजेंद्र तावरे, वल्लभ भोईर, मुकेश भोईर, रुचिता भोईर, प्रार्थना भोईर, सतीश पवार, रोहित म्हात्रे, अक्षय जाधव, कमलाकर पाटील, हर्षल भोईर, पूजा अतुल भोईर आणि जिंदर दहिवाल यांचे विशेष सहकार्य लाभले.
‘सेवा, सामाजिक बांधिलकी आणि समाजाच्या प्रगतीत आपला वाटा’ या उद्देशाने केएमबी ग्लोबल ह्युमॅनिटी फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण झाला असून, फाउंडेशनच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.


Be First to Comment