



खोपोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांच्या सहकार्याने कार्मेल कॉन्व्हेंट स्कूल, खोपोली येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विविध क्रीडाविषयक उपक्रम, प्रकल्प प्रदर्शन आणि मार्गदर्शनपर कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाविषयी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण करण्यासोबतच शिस्त, संघभावना, नेतृत्व, चिकाटी आणि निरोगी जीवनशैली यांचे महत्त्व अधोरेखित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मेजर ध्यानचंद तसेच भारताला पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या विविध क्रीडा प्रतिकृती, प्रकल्प आणि फाईल्सचे प्रदर्शन भरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला उपस्थित मान्यवरांनी विशेष दाद दिली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्पोर्ट्स डान्सने कार्यक्रमात उत्साहाची भर पडली.

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना केवळ मैदानावरील विजयापेक्षा खेळातून मिळणारी शिस्त, पराभव स्वीकारण्याची मानसिकता, संघभावना आणि संघर्षातून पुढे जाण्याची जिद्द यांचे महत्त्व समजावून सांगितले. खिलाडूवृत्ती ही केवळ मैदानापुरती मर्यादित नसून ती दैनंदिन जीवन जगण्याची सकारात्मक पद्धत आहे, असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. आहार, क्रीडा दुखापती, विविध क्रीडा प्रकार, ऑलिम्पिकचा इतिहास आणि खेळातून विकसित होणाऱ्या जीवनकौशल्यांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या संवादात्मक आणि उत्स्फूर्त शैलीतील मार्गदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
युवा खेळाडू शुभम नेमाने, महाराष्ट्र हॉकीचे खजिनदार कैलास सोनार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते डॉ. महादेव शिंदे, राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक अंकित जोशी, आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षक रजिता गौड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
खालापूर तालुका क्रीडा समन्वयक जगदीश मरागजे, ज्येष्ठ क्रीडा शिक्षिका जयश्री नेमाने, समीर शिंदे, स्काऊट मास्टर संदीप साळुंखे, नीता शर्मा, प्रिया फडके, धारा यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.


Be First to Comment