
पनवेल/प्रतिनिधी:
पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नगरसेविका प्रीती जॉर्ज यांनी पर्यावरण संवर्धनाचा एक अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला आहे. केवळ औपचारिक स्वरूपात वाढदिवस साजरा न करता समाजाप्रति असलेली बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने ‘प्रोटेक्ट ट्री फॉर ग्रीन इंडिया फाउंडेशन’च्या माध्यमातून ५०० वृक्षांचे दान करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हणाल्या, “महापौर नितीन पाटील यांनी नेहमीच महिला शक्तीला प्राधान्य दिले आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्यांनी महिलांसाठी विविध योजना आणि उपक्रमांना मंजुरी देऊन मोठी वाढ केली. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी त्यांची ऋणी आहे. त्यांनी वाढदिवसाला बुके किंवा केकऐवजी पुस्तके किंवा समाजोपयोगी वस्तू भेट देण्याचा एक अतिशय सुंदर संदेश दिला आहे.”
याच विचारातून ‘प्रोटेक्ट ट्री फॉर ग्रीन इंडिया फाउंडेशन’चे ओंकार देशमुख यांच्या सहकार्याने आदई डोंगरावर वृक्षारोपण व संवर्धनासाठी ५०० झाडे दान करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही संस्था केवळ पावसाळ्यातच नव्हे, तर ऐन उन्हाळ्यातही कावडीने पाणी वाहून नेऊन डोंगरावरील झाडे जगवण्याचे खडतर कार्य करते. पर्यावरण संवर्धन ही आपली सर्वांची मोठी जबाबदारी असून, येणाऱ्या भावी पिढीसाठी हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Be First to Comment