Press "Enter" to skip to content

देवद येथे पारंपरिक पद्धतीने नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी ; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभागआगरी-कोळी समाज बांधवांची भव्य शोभायात्रा; गाढी नदीला सोन्याचा मुलामा असलेला नारळ अर्पण


पनवेल, दि. २९ (वार्ताहर) : पनवेल तालुक्यातील देवद गाव येथे अखंड कोळी समाज तसेच इतर समाजबांधवांच्या वतीने नारळी पौर्णिमा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. आगरी-कोळी महिला, भगिनी, पुरुष, युवक तसेच बालकांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) देवद शाखेचे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे, शाखाप्रमुख अर्जुन व्हटकर, उपशाखाप्रमुख दीपक दळवी, विजय तूरबाडकर, मोहन खुजे, संजय घाणेकर, गोविंद खरगावकर तसेच कोळी समाजाचे राजेंद्र वायरे व नंदकिशोर मांजरेकर यांच्या पुढाकाराने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.

देवद येथील शिवसेना शाखेपासून शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी पारंपरिक कोळी गीतांवर महिला व तरुणांनी उत्स्फूर्तपणे नृत्य केले. ‘दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. येणारा मच्छिमारीचा हंगाम सुखाचा जाऊ दे,’ अशी प्रार्थना करीत कोळी बांधवांनी समुद्राला साकडे घातले.
शोभायात्रेतील सोन्याचा मुलामा असलेला नारळ देवद येथील गाढी नदीमध्ये भावपूर्ण वातावरणात अर्पण करण्यात आला. पारंपरिक रूढी-परंपरांचे जतन करत सण साजरा करण्यात आल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

या कार्यक्रमाला शिवसेना रायगड उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, विभागप्रमुख विश्वास पेटकर, नवीन पनवेल विभागप्रमुख धनंजय पाटील, महाराष्ट्र डॉ. सेलचे उपाध्यक्ष डॉ. आशिष बांदेकर, पनवेल विभागप्रमुख बिपिन झुरे, अखंड कोळी समाजाचे प्रमुख गोविंद खरगावकर यांच्यासह हरीश पाभरेकर, केशव मेंदाडकर, भावेश खरगावकर, कुंदन खरगावकर, नरेश पाटील, दीपाली मेंदाडकर, मंदा पाभरेकर, रेखा वास्कर, सुगंधा पाभरेकर, नेहा पाभरेकर, उपासना बसवत, सोनी पाटील, अॅड. कीर्ती तूरबाडकर, गणेश वायरे, मदन मेंदाडकर, परशुराम खरगावकर, संतोष मते, सुधीर तूरबाडकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

शोभायात्रा भव्यदिव्य करण्यासाठी तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आगरी-कोळी समाजासह इतर समाजबांधवांनीही उत्स्फूर्त उपस्थिती लावून या पारंपरिक सणाची शोभा वाढवली. शिस्तबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात शोभायात्रेचा समारोप झाला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.