
पनवेल (प्रतिनिधी):
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात अंतर्गत वाद उफाळून आला असून, पक्षाचे कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष प्रभाकर शाबा कांबळे यांच्या थेट निलंबनाचे पत्र जारी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, या कारवाईबाबत रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी हे निलंबन आपल्याला विश्वासात न घेता केल्याचे स्पष्ट केले आहे.
पत्रात काय आहेत आरोप ?
कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या पत्रानुसार (दि. २५ ऑगस्ट २०२६), प्रभाकर कांबळे हे गेल्या २ वर्षांपासून वरिष्ठ कार्यकर्त्यांना अपशब्द वापरणे, वादग्रस्त भाषा वापरणे आणि पक्षातील नेत्यांवर नाहक आरोप करत सोशल मीडियावर खालच्या दर्जाची भाषा वापरत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. वारंवार सूचना देऊनही वर्तनात सुधारणा न झाल्याचे सांगत कांबळे यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे या पत्रात नमूद केले आहे
या पत्राच्या पार्श्वभूमीवर माध्यमांनी आरपीआय (आठवले) रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोकण प्रांत अध्यक्षांच्या या निर्णयावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.
नरेंद्र गायकवाड म्हणाले की, “मी रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. कोकण प्रांत अध्यक्षांनी प्रभाकर कांबळे यांच्या थेट निलंबनाचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले, मात्र यासंदर्भात माझ्याशी कोणतीही पूर्वचर्चा केली नाही. कांबळे यांना कोणतीही ‘कारणे दाखवा नोटीस न देता ही एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे.”
गायकवाड यांनी पुढे स्पष्ट केले की, हे निलंबन नियमानुसार नसून या संपूर्ण प्रकरणावर पक्षाचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रीय अध्यक्ष केंद्र मंत्री ना. डॉ. रामदास आठवले साहेब यांच्याशी चर्चा झाली आहे. आठवले साहेबांशी बोलणे झाल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय होईल, असेही गायकवाड यांनी सांगितले




Be First to Comment