

देशरक्षणाच्या व्रताला बंधुत्वाची ओवाळणी; बेलापूरमध्ये सीआरपीएफ जवानांसोबत अनोखे रक्षाबंधन
पनवेल | प्रतिनिधी :राखीचा एक धागा… दिसायला नाजूक, पण भावनांनी मात्र अतूट! या धाग्यात बहिणीचे प्रेम, भावाची काळजी, नात्यातील विश्वास आणि एकमेकांच्या रक्षणाची मूक शपथ गुंफलेली असते. घराघरांत भाऊ-बहिणीच्या प्रेमाने रक्षाबंधनाचा सण साजरा होत असताना देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर कर्तव्यावर असलेल्या जवानांच्या मनगटावर मात्र अनेकदा राखी बांधली जात नाही. हीच उणीव भरून काढत बेलापूर येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशासकीय कार्यालयात संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने जवान आणि अधिकाऱ्यांसोबत भावस्पर्शी रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव नाही, तर ‘मी तुझ्या पाठीशी आहे’ या भावनेचा पवित्र धागा आहे. याच भावनेला राष्ट्रप्रेमाची किनार देत संकल्प संस्थेच्या महिला भगिनींनी केंद्रीय राखीव पोलीस दलातील अधिकारी व जवानांच्या मनगटावर राख्या बांधल्या. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी चोवीस तास सज्ज असणाऱ्या या जवानांसाठी हा क्षण कुटुंबापासून दूर असलेल्या भावाला मिळालेल्या बहिणीच्या मायेइतकाच जिव्हाळ्याचा ठरला.
भारतीय सैन्यदल सीमेवर उभे राहून देशाचे संरक्षण करते. परकीय आक्रमणांना रोखण्यासाठी तिन्ही संरक्षण दलातील जवान सदैव सज्ज असतात. मात्र देशाची सुरक्षा केवळ सीमेपुरती मर्यादित नसते. देशाच्या अंतर्गत शांततेला तडा जाऊ नये, देशविरोधी कारवायांना आळा बसावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला बाधा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवानही तितक्याच निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात.
बेलापूर येथील सीजीओ संकुलातील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कार्यालयातून महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, दमण-दीव आणि पुद्दुचेरी या भागातील कामकाजाचा समन्वय साधला जातो. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी आणि जवानांवर मोठी जबाबदारी आहे. सण, उत्सव, कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण यांपेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत हे जवान देशसेवेत कार्यरत असतात. अशा कर्तव्यनिष्ठ बांधवांच्या मनगटावर राखी बांधण्याचा संकल्प संस्थेने केला आणि रक्षाबंधनाचा हा सोहळा एका वेगळ्याच भावविश्वात पोहोचला.

या वेळी पश्चिम विभागाचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र अग्रवाल, पोलीस उपमहानिरीक्षक रवींद्र सिंह रौतेला, पोलीस उपमहानिरीक्षक (प्रशासन) शिवप्रकाश उपाध्याय, कमांडेन्ट अमर सिंह मीना, कमांडेन्ट धर्यपाल सिंह तसेच कमांडेन्ट तेजिंदर कौर यांच्या मनगटावर राख्या बांधण्यात आल्या.
राखी बांधताना उपस्थित महिला भगिनींच्या चेहऱ्यावर आनंद होता; तर कर्तव्याच्या कठोर वर्दीत असलेल्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावरही त्या क्षणी आपुलकीचे भाव उमटले. काही क्षणांसाठी कार्यालयातील वातावरण अधिकृततेच्या चौकटीबाहेर गेले आणि तेथे अधिकारी-जवान नव्हे, तर भाऊ आणि बहिणीचे नाते जिवंत झाले. मायेच्या एका धाग्याने कर्तव्य आणि समाज यांच्यामधील अंतरही जणू मिटून गेले.
संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष वैशाली जगदाळे, उपाध्यक्ष प्राची रानडे, खजिनदार अस्मिता गायकर, सहखजिनदार ज्योती पाटील, मनिषा सिंग, गायत्री माने, संजय मोरे, नीता जाधव, पल्लवी एरंडे यांच्यासह महिला भगिनी या वेळी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संकल्प संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यानंतर रक्षाबंधनाचे महत्त्व सांगत देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असलेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी संकल्प शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष वैशाली जगदाळे म्हणाल्या, “रक्षाबंधनाचा सण आम्ही आमच्या भावांबरोबर साजरा करतो. मात्र भारतमातेचे रक्षण करणारे आणि देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस दक्ष असणारे जवानही आमचेच भाऊ आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून त्यांच्या मनगटावर राखी बांधली. या राखीच्या धाग्यात आमचे प्रेम, आदर आणि देशाप्रती असलेली बांधिलकी गुंफलेली आहे.”
दरम्यान, पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र अग्रवाल यांनीही या उपक्रमाबद्दल भावना व्यक्त केल्या. “देशाचे संरक्षण आणि शांतता राखणे हे आमचे कर्तव्य आहे. अनेकदा कुटुंबासोबत सण-उत्सव साजरे करता येत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. मात्र आम्ही प्रत्येकाने कर्तव्याचे व्रत अंगीकारले आहे. रक्षाबंधनाचा सण आमच्यासाठीही अत्यंत भावनिक आहे. संकल्प संस्थेच्या माध्यमातून महिला भगिनींनी आम्हाला राख्या बांधून आमच्यासोबत हा सण साजरा केला. त्यामुळे खऱ्या अर्थाने बंधुत्व, आपुलकी आणि देशप्रेमाची बांधिलकी जपली गेली,” असे त्यांनी सांगितले.
माजी सैन्य अधिकारी संजय मोरे यांच्या समन्वयाने हा हृदयस्पर्शी कार्यक्रम पार पडला. देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या कुटुंबापासून दूर राहणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्या मायेची ऊब मिळाली आणि संकल्प संस्थेच्या या उपक्रमातून ‘देश एक कुटुंब आहे’ या भावनेचा सुंदर प्रत्यय आला. चंदूकाका सराफ कडून रक्षाबंधनानिमित्त अधिकाऱ्यांना भेट देण्यात आली.




Be First to Comment