
निवडणूक आयोगाची ३,४०० गोपनीय गणनापत्रके झेरॉक्स सेंटरवर आढळली; प्रशासनाची तातडीची कारवाई
पनवेल, दि.२८ (वार्ताहर) : खारघर सेक्टर १९ येथील एका खाजगी झेरॉक्स सेंटरवर निवडणूक आयोगाची अतिसंवेदनशील गणनापत्रके बेकायदेशीरपणे झेरॉक्स करताना सूरज पाटील याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरोधात खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शासकीय कामकाजात गंभीर हलगर्जीपणा आणि निवडणूक प्रक्रियेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याचा ठपका ठेवत प्रशासनाने संबंधित पाच बीएलओंना तात्काळ निलंबित केले आहे. या घटनेमुळे खारघर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार आवाज उठविला होता.
२७ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास खारघर सेक्टर १९ मधील एका झेरॉक्स सेंटरमध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकृत गणनापत्रकांच्या छपाईचे काम सुरू असल्याची तक्रार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाली होती. माहिती मिळताच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाड टाकून तपास केला असता, सूरज पाटील हा इसम सुमारे ३,४०० गणनापत्रके झेरॉक्स करण्यासाठी घेऊन आल्याचे उघड झाले.
या गणनापत्रकांची सखोल तपासणी केली असता, ती खारघर क्षेत्रातील ११ वेगवेगळ्या मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी पाच मतदान केंद्रांच्या गणनापत्रकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे आढळून आले.

याबाबतची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, सह संपर्क प्रमुख अनिल चव्हाण, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, नगरसेविका लीना गरड, महानगरप्रमुख समाधान काशीद, विभागप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, विश्वास पेटकर, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, नितीन गावंड, कैलास पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करून सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात ठाण मांडून शासनाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.
या घटनेची दखल रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे व प्रांताधिकारी पवन चांडक यांनी घेऊन निवडणूक आयोगाची शासकीय आणि अत्यंत गोपनीय कागदपत्रे अनधिकृतपणे बाळगणे तसेच त्यांची खाजगी दुकानात छपाई करणे हे गंभीर स्वरूपाचे कृत्य असल्याने सूरज पाटील याच्याविरोधात भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविला. तसेच तपासादरम्यान ज्या पाच बीएलओंच्या दप्तरातून प्रत्येकी शंभरहून अधिक गणनापत्रके अनधिकृत व्यक्तीकडे गेल्याचे निष्पन्न झाले, त्या बीएलओंनी स्वतःची शासकीय जबाबदारी इतरांकडे सोपविल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. व त्यांच्याविरोधात विभागीय शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली आल्याची जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.
प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार विभागीय चौकशी सुरू असल्याने संबंधित बीएलओंची नावे सध्या गोपनीय ठेवण्यात आली असून, तपासाच्या पुढील टप्प्यात ती जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील गोपनीयता, कागदपत्रांची सुरक्षितता आणि अधिकाऱ्यांच्या जबाबदारीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
फोटो : किशन जावळे व पवन चांडक कारवाईची माहिती देताना



Be First to Comment