Press "Enter" to skip to content

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर पनवेल पोलिसांचा चोख बंदोबस्त ! पनवेल

‘मौल्यवान दागिने, मोठी रोकड घेऊन बाहेर पडू नका’; वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांचे नागरिकांना आवाहन

रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर पनवेल शहरात नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पनवेल शहर पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एस टी स्टैंड,बाजारपेठा, गर्दीची ठिकाणेतसेच महत्त्वाच्या परिसरांमध्ये पोलिसांची विशेष नजर असून, पोलिसांकडून पायी गस्तही सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, नागरिकांनी सणाच्या उत्साहात मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने अथवा रोख रक्कम घेऊन बाहेर पडू नये, तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पनवेल शहर पोलिसांनी केले आहे.

पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल यांनी नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने एस टी स्टैंड पनवेल येथून महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रक्षाबंधन सणानिमित्त बाजारपेठा, दुकाने, सार्वजनिक ठिकाणे आणि रस्त्यांवर नागरिकांची मोठी गर्दी होणार असल्याने या गर्दीचा फायदा घेत चोरी, पाकीटमारी अथवा इतर गुन्हे घडू नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

गर्दीत मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या!
सणानिमित्त बाहेर पडताना नागरिकांनी शक्यतो अनावश्यक मौल्यवान वस्तू, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम अथवा महागडे दागिने सोबत बाळगू नयेत. महिलांनी गर्दीच्या ठिकाणी दागिने तसेच पर्सची विशेष काळजी घ्यावी. तसेच वाहनांमध्ये मौल्यवान वस्तू ठेवून वाहन बेवारस सोडू नये, अशी सूचनाही पोलिसांकडून करण्यात आली आहे.

संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना कळवा
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. परिसरात संशयास्पद व्यक्ती, वाहन किंवा हालचाल निदर्शनास आल्यास स्वतःहून कारवाई करण्याऐवजी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. एखादी अनुचित घटना घडल्यास ती लपवून न ठेवता पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असेही पोलीस निरीक्षक (गुन्हे) शाकीर पटेल यांनी स्पष्ट केले. रक्षाबंधन सण शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा यासाठी पनवेल शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, पायी गस्त आणि आवश्यक त्या ठिकाणी विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘सणाचा आनंद घ्या; मात्र सुरक्षिततेची काळजी घ्या’, असा संदेश देत पनवेल शहर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.