
खोपोली : प्रतिनिधी
ताम्हिणी घाट परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याच्या प्रकरणाचा तपास रायगड पोलिसांनी वेगाने करून या प्रकरणातील दोन संशयित आरोपींना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.
दि. २५ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजता माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताम्हिणी घाट परिसरात एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र. ५३/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली होती. पुढील तपासादरम्यान या प्रकरणी गुन्हा क्र. २४५/२०२६, BNS कलम १०३(१) अन्वये दाखल करण्यात आला.
या गुन्ह्याचा समांतर तपास रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, रायगड तसेच माणगाव पोलिसांकडून करण्यात येत होता.
तपासादरम्यान करण्यात आलेल्या तांत्रिक विश्लेषणातून दुर्गाप्रसाद मंगालप्रसाद प्रजापती (वय २४) आणि दिनेशकुमार विश्राम प्रजापती (वय २६) यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेतले.
प्राथमिक तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याबाबत माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या गुन्ह्यासाठी आरोपी दिनेशकुमार प्रजापती याच्या मालकीची स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH-12-FY-5136) वापरण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी माणगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे. ही कामगिरी यशस्वी करण्यासाठी मुंबई सपोनि मानसिंग पाटील, पोलीस हवालदार रविंद्र मुंढे, प्रतिक सावंत, रणजितसिंह खराडे, अक्षय पाटील, प्रदीप खरात तसेच तुषार घरत (सायबर सेल) यांनी तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिसांच्या तांत्रिक तपासामुळे अवघ्या काही तासांत या प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहोचता आल्याने तपास पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



Be First to Comment