
पनवेल, दि.२६ (वार्ताहर) : रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करंजाडे येथे महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला मंगळागौर सोहळा उत्साहपूर्ण आणि आनंदी वातावरणात पार पडला. महिलांनी पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध कलाविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली.
कार्यक्रमाच्या तयारीसाठी महिलांनी सुमारे महिनाभर नियमित सराव केला होता. त्यांच्या मेहनतीचे आणि उत्स्फूर्त सहभागाचे रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानचे सरचिटणीस दिनेश धामणस्कर यांनी कौतुक केले. महिलांनी आपली कला, संस्कृती आणि एकजूट जपत सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देणारे गुजर, आगरे आणि चाळके यांचे विशेष आभार मानण्यात आले. तसेच प्रशांत भेकरे, धुमाळी, नरळकर, पेडामकर, पानगले, मुरुडकर, मानसिंग यांच्यासह प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाला सरपंच मंगेश शेलार व त्यांच्या पत्नी यांच्यासह विनोद साबळे, रामेश्वर आंग्रे, प्रथमेश पुंडे, प्रीती शहारे, अंजू सिंग, नाथाभाई भारवाड, भरत कार्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरीकर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून भविष्यातही विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि विधायक उपक्रम राबविण्यात येणार असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.


Be First to Comment