Press "Enter" to skip to content

सोनसाखळी चोरीतील दोन सराईत आरोपी अटकेत; ७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई : सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत नवी मुंबई गुन्हे शाखा, कक्ष-१ वाशीच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक केली. आरोपींकडून ७ लाख ३९ हजार ६२७ रुपये किमतीच्या सहा सोन्याच्या चेन आणि ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत आरोपींनी खारघर, कोपरखैरणे आणि रबाळे परिसरातील आणखी पाच जबरी चेन चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) सचिन गुंजाळ यांनी शहरातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांची उकल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष-१च्या पथकाने खारघर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला.

तपासादरम्यान घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये आरोपींचा पेहराव तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल आढळून आली. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले.

नौशाद मुस्ताक आलम ऊर्फ सागर (३२, कामोठे) आणि प्रशांत राजू मगर ऊर्फ प्रशांत भगवान वाघमारे ऊर्फ प्रशांत बबन वाघमारे (३६, कोपरखैरणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक करण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपींनी खारघर, कोपरखैरणे आणि रबाळे परिसरात जबरी चेन चोरीचे आणखी पाच गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींविरुद्ध यापूर्वीही घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईत ६९.९५० ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या चेन आणि होंडा शाइन मोटारसायकल (एमएच-०५-सीएफ-०७१६) हस्तगत करण्यात आली आहे. या प्रकरणातील पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष-१, वाशी करीत आहे.

ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-१चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बंकर यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.