
पनवेल : चंदेरी किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तीन तरुणांचा डोंगरात रस्ता चुकल्याने ते भरकटले. मदतीसाठी त्यांनी ११२ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून तिन्ही तरुणांना सुखरूपपणे गडाच्या पायथ्याशी आणले.
वावंजे बिट निर्भया एमडीटीवर सकाळी ११.०८ वाजता चंदेरी किल्ल्यावर काही जण अडकले असून त्यांना पोलीस मदतीची आवश्यकता असल्याचा कॉल प्राप्त झाला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी, पोलीस हवालदार अमर भालसिंग आणि पोलीस नाईक मिलिंद जाधव घटनास्थळी रवाना झाले.
ओम खिलारी, पार्थ कडवे आणि रूषिल वृंदावन हे तिघेही कामोठे, पनवेल येथील रहिवासी असून ते चंदेरी किल्ला, तामसई येथे ट्रेकिंगसाठी आले होते. मात्र, डोंगरातील वाट चुकल्याने ते हरवले. पोलिसांनी रिटघर गावचे पोलीस पाटील दीपक पाटील तसेच सह्याद्री प्रतिष्ठान पनवेलचे दुर्गसेवक गौरव दरवडा, मयूर टकले आणि आदेश पाडेकर यांच्या मदतीने शोधमोहीम राबवली.
काही वेळातच तिन्ही तरुणांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांना सुरक्षितपणे गडाच्या पायथ्याशी आणण्यात आले. चौकशीत ते सकाळी ८ वाजता पनवेलहून ट्रेकिंगसाठी आल्याचे स्पष्ट झाले. डोंगरात रस्ता चुकल्याने त्यांनी ११२ वर मदतीसाठी कॉल केला होता.
पोलिसांनी तिघांना आवश्यक ती मदत करून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. त्यांच्या वडिलांना दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांच्या तत्परतेमुळे तीनही तरुण सुखरूप बचावले.


Be First to Comment