Press "Enter" to skip to content

खारघर हिल महापौर मॅरेथॉनला ‘सुपरकॉप’ IPS कृष्ण प्रकाश धावणार

७ हजार धावपटूंचा सहभाग, २३ ऑगस्टला वाहतुकीत मोठे बदल

पनवेल/प्रतिनिधी:
पनवेल महानगरपालिकेतर्फे आयोजित देशातील पहिल्या ‘खारघर हिल महापौर मॅरेथॉन’ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेत प्रसिद्ध ‘सुपरकॉप’ IPS कृष्ण प्रकाश स्वतः सहभागी होणार असून, त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धेची रंगत वाढली आहे. या मॅरेथॉनचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून प्रसिद्ध मराठी अभिनेते अंकुश चौधरी असणार आहेत. देश-विदेशातून तब्बल ७ हजारांहून अधिक धावपटूंनी यासाठी नोंदणी केली आहे.

ही मॅरेथॉन केवळ एक स्पर्धा नसून खारघरच्या निसर्गरम्य टेकड्यांचा आणि आरोग्याचा उत्सव ठरणार आहे. ऑल इंडिया अ‍ॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे प्रतिष्ठेचे AIMS प्रमाणपत्र प्राप्त झाल्यामुळे या स्पर्धेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला आहे. या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महापौर नितीन पाटील आणि सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांच्या संकल्पनेतून १०० दिव्यांग बांधवदेखील यात सहभागी होणार आहेत. धावण्याची आवड असलेल्या दिव्यांगांना प्रोत्साहन देण्यासाठी हे विशेष व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

दरम्यान, २३ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या या मॅरेथॉनमुळे खारघर परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. खारघर वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सकाळी ०४:०० ते ११:०० या वेळेत काही रस्ते वाहतुकीसाठी बंद राहतील. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही स्पर्धा ३ किमी, ५ किमी, १० किमी, २१ किमी आणि ४२ किमी अशा पाच गटांत पार पडणार आहे.

सर्व स्पर्धांचा प्रारंभ आणि समाप्ती (Start Point & End Point) सेंट्रल पार्क येथे असेल. ३ व ५ किमी स्पर्धा गुरुद्वारा, जे. कुमार सर्कल, बी. डी. सोमाणी चौक आणि विनायक सेठ चौक मार्गे होईल. तर १०, २१ आणि ४२ किमीची स्पर्धा इस्कॉन मंदिर, ग्रामविकास भवन, तवा हॉटेल, उत्सव चौक, बेलपाडा, RBI मेट्रो स्टेशन, फणसवाडी टेकडी, ओवेगाव पोलीस चौकी, टाटा हॉस्पिटल, तळोजा जेल आणि पापडीचा पाडा या मार्गाने धावणार आहे.

नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सेंट्रल पार्क ते RBI मेट्रो स्टेशन, जे. कुमार सर्कल ते ओवेगाव आणि गुरुद्वारा ते टाटा हॉस्पिटल या मार्गांवर एक बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला राहील. तसेच RAF कडून येणारी वाहने पापडीचा पाडा सर्कलमधून वळवण्यात आली आहेत. ही वाहतूक बंदी पोलीस, फायर ब्रिगेड आणि रुग्णवाहिका यांसारख्या अत्यावश्यक सेवांना लागू असणार नाही.

शहराच्या क्रीडा आणि आरोग्य संस्कृतीला चालना देण्यासाठी ही मॅरेथॉन मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, मुख्य प्रवर्तक परेश ठाकूर आणि विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केला असून नागरिकांना यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.