Press "Enter" to skip to content

सिटी बेल लाइव्ह विचार कट्टा : मातृदिन

मातृदिन

“मातृदिनाच्या हार्दिक सूभेच्छा “आता काहीजण विचार करतील हा मातृदिन कुठून आला ? हेच मला माझ्या काही मित्रांनी विचारले ,मदर्स डे असतो पण मातृदिन काय आहे ?
खरचं हे आपले दुर्भाग्य आहे की काल-परवाचा मदर्स डे तुम्हाला माहीत आहे पण पारंपरिक चालून आलेल्या मातृदिना विषयी माहिती नसावी ?
हिंदू पंचागानुसार श्रावणातील शेवटचा दिवस म्हणजे मातृदिन आणि तोच पिठोरी आमावस्या.
महाराष्ट्रात हा सण पोला म्हणूनही साजरा केला जातो, ह्या दिवसी बैलाची पुजा केली जाते .
उत्तर भारतात दुर्गा तर दक्षिण भारतात तिचेच रूप पोलेरम्मा म्हणून पुजले जाते .
ओडिसा ,आंध्रप्रदेश,कर्नाटक ,तामिलनाडु इथे पोलाला हा सण मुख्यतः साजरा केला जातो .
मदर्स डे हा दिवस मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा करतात , त्याला पंचागाशी काहीच सबंध नाही पण ,पिठोरी अमावस्येच तसे नसते ,वर्षाच्या सर्व अमावस्या काळ्या असतात पण या अमावस्येला आकाशात पिठासारख्या चांदण्या दिसतात ,त्या चौसष्ठ योगिणी असतात अशे जुने लोक म्हणतात म्हणून ही पिठोरी अमावस्या.
भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या जातात ,उत्तर भारतीय कथे प्रमाणे एका गावात सात विवाहित भाऊ असतात ,ते सह-कुटुब पिठोरी अमावस्या हा सण साजरा करण्याचा संकल्प करतात पण दरवर्षी त्याच दिवशी एकीचा तरी लहान मुलगा मृत्यू पावतो ,आणि हा सण अर्धवट राहतो.
सातव्या वर्षीही असच होते, पण ती आई काळजावर दगड ठेवून मेलेल्या मुलाला लपवून ठेवते व देवीची पुजा संपन्न होते, रात्री एकटीच रडत असताना देवी म्हातारीच्या रुपात येऊन सांगते “मुलांचे जिथे अंतसंस्कार झालेत तेथे हळद शिंपड “ती तशी करताच सातही मुले जिवंत होऊन येतात .
तसेच दक्षिणेत सांगतात की एका बाईचे लहान मुलं आजाराणे मृतावस्थेत पडले असते तीच्याकडे काहीच पैसे नसतात ,ती देवीच्या देवळा बाहेर
रडत बसली असताना देवळातून एक बाई येऊन तीला हे व्रत करायला सांगते ,ती दुसऱ्याच दिवशी हे व्रत करते ,तिचा मुलगा ठणठणीत बरा होतो.
महाराष्ट्रात ही कथा थोडी वेगळी आहे
खूप जुन्या काळी एका गावात एका स्त्रीला दरवर्षी श्रावण अमावास्येला एक मूल होत असे आणि लगेच ते मरून जात असे. त्याच दिवशी तिच्या आजे सास-याचे श्राध्द असे पण श्राध्दाला आलेले भटजी उपाशीच निघून जात असत. असे ओळीवार सात वर्षे झाल्यानंतर त्या स्त्रीच्या सास-याने तिला तिच्या नवजात अर्भकाच्या शवासकट घरातून हाकलून दिले. निराधार होऊन मरण्यासाठी ती बाई अरण्यात जाते. त्या निराश स्त्रीला रानात एक भिल्लीन भेटते ती तीला आपली कर्म कहाणी सांगते ,तीला तिची दया येते ,ती सांगते आज श्रावणातील शेवटची अमावस्या पुढे जंगलात एक बेळीच्या झाडाखाली शिवलिंग आहे ,आज रात्री स्वर्गातुन नागकन्या व देवकन्या अश्या चौसष्ट योगिनी येतील व पुजा करतील तु झाडावर बसुन रहा ,त्यांची पुजा झाली की विचारतील अतिथी कोण? तेव्हा तु खाली उतरुन मी आहे असे बोल ,तीच्या सांगण्याप्रमाणे तीने तसेच केले ,तीला चौसष्ट योगिणी भेटल्या. तिने त्यांना आपले दुःख सांगितल्यावर “तुझी-मुले जगतील’ असा योगिनींनी वर दिला. त्या वरामुळे त्या स्त्रीचे सर्व मुलगे जिवंत झाले. मग त्या स्त्रीने आपल्या पुत्रांसह घरी जाऊन चौसष्ट योगिनींची पूजा केली. अशी या व्रताची कथा आहे.
पुढे तिने ही कथा सर्वांना सांगितली परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन ‘अतिथी कोण?’ असे विचारते. तेव्हा मुलं ‘मी आहे’ असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.

ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.
नैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अश्या रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात.

अजय शिवकर
केळवणे पनवेल
७९७७९५०४६४

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.