Press "Enter" to skip to content

पेण वडखळ परिसरात बंगाली बोगस डॉक्टरला अटक ; 54 हजारांचे औषधे व इंजेक्शनसाठा जप्त

पेण, दि. 20 ( प्रतिनिधी) -: पेण- वडखळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एल.अँड.टी.कॉलनी सालिंदे येथे वैद्यकीय अर्हता नसताना डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे व इंजेक्शने देणारा बंगाली बोगस डॉक्टर दीपकर सुशांत दास ( मूळ रा.चक, जितीकापोटा, वेस्ट बंगाल) याला वडखळ पोलिसांच्या ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास HPR ID बनविण्यासाठी तपासणी सुरू असताना एल.अँड.टी. कॉलनी सालिंदे येथील पडीक पत्र्याच्या शेडमध्ये दिपकर दास हा बोगस डॉक्टर बेकायदेशीरपणे दवाखाना सुरू करून इंजेक्शन व औषधांचा साठा बाळगताना आढळून आला गटविकास अधिकारी लेंडी व वैद्यकीय अधिकारी चेतन मोकल यांच्या कडून त्याची विचारपूस सुरू असताना तो पळून जाण्याच्या प्रयत्न केले असता त्याला पुन्हा पकडला.

सदर बोगस बंगाली डॉक्टरला वैद्यकीय शिक्षण विचारले असता त्याच्याकडे कोणतीही वैद्यकीय अर्हता नसतानाही तो स्वतःला डॉक्टर असल्याचे भासवत रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे व इंजेक्शन देत होता.तसेच रुग्णांकडून अवाढव्य फीच्या स्वरूपात मोबदला घेऊन गैरलाभ मिळवत होता. त्याची सखोल चौकशी केली असता तो कलकत्ता येथे कंपाउंडरचे काम करत असल्याचे त्याने सांगितले.या कारवाईत त्याच्याकडून एकूण 54 हजार 614 रुपये किमतीचा इंजेक्शन व औषधसाठा जप्त करत दवाखान्यासाठी लागणारा 1 टेबल, 2 खुर्च्या, 3 स्टूल, 2 मांडण्या, 1 बेड व 1 कापडाचे पार्टिशन ताब्यात घेण्यात आले आहे.यामध्ये सदर बोगस डॉक्टरला कोणत्या मेडिकल मधून औषधे व इंजेक्शन पुरवठा व्हायचा याचीही सखोल चौकशी पोलिसांनी करून त्याच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचे असल्याचे नागरीकांकडून बोलले जात आहे.

सदर धडक कारवाई पेण गटविकास अधिकारी गजानन लेंडी, गडब वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतन अविनाश म्हात्रे, आरोग्य सहाय्यक दिपक पुंडलिक म्हात्रे, गणपत जानू वारगूडे, उल्हास हिराजी म्हात्रे, सागर सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर यांच्या पथकाने केली असून अधिक तपास वडखळ पोलीस उपनिरीक्षक श्रीमती सांगळे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.