
पेण उपजिल्हा रुग्णालयात स्वच्छतेचे तीनतेरा तर शवगृह आठ दिवस बंद

शवविच्छेदन गृह सुरू करून परिसर स्वच्छ करा अन्यथा आंदोलन — प्रसाद भोईर
पेण (वार्ताहर) : पेण उपजिल्हा रुग्णालयात मागील काही दिवसांपासून सर्वत्र अस्वच्छता पसरली असून येथील असणारे शवविच्छेदन गृह गेल्या आठ दिवसांपासून बंद अवस्थेत असताना त्या गृहामध्ये उंदराच्या लेंड्या किडे आढळल्याने मृत बॉडीची विटंबना झाल्याचा प्रकार समोर आला आहे.त्यामुळे शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन येथील सफाई ठेकेदार आणि संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पेण उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली असता रुग्णालयाच्या स्वच्छतेसह शवविच्छेदन गृह बंद अवस्थेत असल्याचे आढळून येऊन ज्या ठिकाणी बॉडी ठेवण्यात येते ती शीतपेटी सुद्धा काही दिवसांपासून बंद असून त्याच्यावर उंदराच्या लेंड्या आणि किडे आढळून आल्याने येथे ठेवण्यात येणाऱ्या मृत बॉडीची विटंबना करण्याचा अधिकार संबंधित रुग्णालयाला कोणी दिला असा सवाल प्रसाद भोईर यांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारण्यात आला आहे.
तर या शवविच्छेदन गृहाच्या आजूबाजूचा परिसर देखील अस्वच्छतेने पसरलेला असून सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे.रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या पेणच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने शासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन पेण शहरासह तालुक्यातील गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी तसेच आदिवासींसह इतरही समाजासाठी असणाऱ्या रुग्णालयाची रुग्णांकरिता योग्यती उपाययोजना करावी अशीही मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली असून अन्यथा याकरिता उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, माजी नगरसेवक तथा पेण शहर अध्यक्ष सुहास पाटील, माजी तालुकाध्यक्ष जगदीश ठाकुर, योगेश पाटील, अविनाश म्हात्रे, चेतन मोकल, रवींद्र म्हात्रे, नंदू मोकल, मुन्ना आखवारे आदिंसह शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदनगृह मागच्या पाच दिवसांपासून बंद अवस्थेत असून लवकरच ते सुरू करण्यात येईल यासह येथील असणारी अस्वच्छता ती सुद्धा संबंधित ठेकेदाराला सांगून संपूर्ण परिसर लवकरात लवकर स्वच्छ करण्यात येईल.
–डॉ.ज्ञानेश्वर आरसाळे- प्रभारी वैद्यकीय अधीक्षक पेण




Be First to Comment