Press "Enter" to skip to content

भरतशेठ गोगावले पालकमंत्री; तटकरे यांच्या वर्चस्वाला शिवसेनेचे थेट आव्हान ? रोह्यात शिवसैनिकांचा तुफान जल्लोष!

रोहा : समीर बामुगडे

रोहा : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांची नियुक्ती झाल्याने रोहा तालुक्यात शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नियुक्तीची घोषणा होताच रोह्यात असंख्य शिवसैनिकांनी एकत्र येत जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

भरतशेठ गोगावले यांच्याकडे रायगड जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आल्याने जिल्ह्याच्या राजकारणात नव्या सत्तासमीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. रायगडच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांचे दीर्घकाळ प्रभावी राजकीय वर्चस्व राहिले आहे. अशा पार्श्वभूमीवर गोगावले यांची पालकमंत्रीपदी झालेली नियुक्ती ही शिवसेनेसाठी महत्त्वाची राजकीय घडामोड मानली जात असून, तटकरे यांच्या वर्चस्वाला शिवसेनेचे थेट आव्हान उभे राहणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, गोगावले यांच्या नेतृत्वाखाली रायगडच्या विकासाला अधिक वेग मिळेल, जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रशासनाच्या पातळीवर प्रभावीपणे सोडवल्या जातील, असा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला.

या जल्लोषात अशोकशेठ धोत्रे, लालताशेठ कुशवाहा, निलेशशेठ वारंगे, माजी शहर प्रमुख मंगेश रावकर, अजिज महाडकर, वसीम सौवरटकर, अमलकांत मोरे, रोशन पवार, राहुल गुरव, ॲड. प्रवीण दाभाडे, आकाश कीर यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भरतशेठ गोगावले यांच्या नियुक्तीमुळे रायगडमध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणात या नियुक्तीचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.