Press "Enter" to skip to content

नागपंचमी निमित्त भक्तिभावाने पूजा-अर्चा

श्रावणाच्या पहिल्या सोमवारी रसायनी परिसरातील शिवमंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी

रसायनी (आनंद पवार)

श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि नागपंचमीचा पवित्र योग साधत रसायनी परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये आज सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली होती.महिला भगिनींसह शिवभक्तांनी मोठ्या श्रद्धेने भगवान शिवशंकराची पूजा-अर्चा करून दुग्धाभिषेक,पुष्प अर्पण करीत मनोभावे दर्शन घेतले.

श्रावण महिना सुरू झाला की,महिला भगिनींसह अनेक भाविक भक्तगण श्रद्धेने उपवास व व्रत पाळतात.कुटुंबात सुख,शांती व समृद्धी नांदावी,आरोग्य लाभावे आणि भगवान शिवशंकराची कृपादृष्टी राहावी,या भावनेने श्रावणातील सोमवारचे व्रत अत्यंत श्रद्धेने केले जाते.नागपंचमी आणि श्रावण महिन्याचा पहिला सोमवार एकाच दिवशी आल्याने यंदा या धार्मिक पर्वाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.रसायनी परिसरातील पाताळगंगा नदीच्या किनारी असलेल्या जागृत रसरेश्वर शिव मंदिरात सकाळपासूनच महिला व भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी शिवलिंगावर जल व दुग्धाभिषेक करून बेलपत्र,पुष्प अर्पण करीत भक्तिभावाने पूजा केली.

त्याचप्रमाणे दांड फाटा येथील टाटा पावर हाउसच्या बाजूला असलेलेशिवमंदिर,गुळसुंदे येथील पुरातन शिवमंदिर तसेच पाताळगंगा येथील पाताळेश्वर मंदिरातही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवशंभोचे दर्शन घेतले.मंदिर परिसरात सकाळपासूनच भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.श्रावणाच्या पहिल्या सोमवारी हर हर महादेव,शिवशंभोच्या जयघोषाने रसायनी परिसरातील शिवमंदिरे दुमदुमून गेलीहोती.महिला भगिनींनी पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा व उपवास करून नागपंचमीचा सणही मोठ्या भक्तिभावाने साजरा केला.त्यामुळे संपूर्ण रसायनी परिसरात दिवसभर धार्मिक आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.