Press "Enter" to skip to content

‘सर्जा-राजा’ च्या सणावर कोरोनाचे सावट

सर्जा-राजा’ च्या सणावर कोरोनाचे सावट

लेखक सुरेश मंत्री.
श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा’. गेल्यावर्षी हा सण महाराष्ट्रातील बहुतांश भागावर दुष्काळाचे सावट असल्याने काहीसा कमी उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावर्षी आत्तापर्यंत चांगला पाऊस होवूनही कोरोना महामारीमुळे साथ प्रतिबंधक नियंत्रण कायद्याअंतर्गत ३१ अॉगस्ट पर्यंत लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक सण-उत्सव साजरा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असुन ईच्छा असुनही वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलांना सजवुन त्यांची मिरवणुक काढता येणार नाही याची हुरहुर शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे हा सण केवळ औपचारिकता म्हणून साजरा होण्याची चिन्हे आहेत. तसेच कोरोनामुळे शेती मालाला योग्य भाव नसल्याने बैलांना सजवण्यासाठी दिड ते दोन हजारांपर्यंत खर्च करणारा शेतकरी केवळ तीनशे ते चारशे रुपयांचे खरेदी केलेले साज साहित्य वापरून आपल्या बैलांना सजवणार आहे.
पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते. पोळ्याला त्यांना नदी,ओढय़ात नेऊन धुण्यात येते.नंतर चारून घरी आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला हळद व तुपाने (सध्या महागाईमुळे तेलाने) शेकले जाते.यास खांदेमळणी असे म्हणतात. या सणासाठी शेतक-यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैलांच्या पाठीवर सुरेख नक्षीकाम केलेली झूल,सर्वांगावर गेरूचे ठिपके,शिंगांना बेगड,डोक्याला बाशिंग,मटाट्या,गळ्यात कवड्या व घुंगुरांच्या माळा,नवी वेसण, नवा कासरा,पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे असा सजवितात.खायला गोड पुरणपोळी व सुग्रास अन्नाचा नैवेद्य बनवला जातो.
शेतकरी आपल्या बैलांसह बैलपोळ्यात भाग घेतात.गावाच्या सीमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करून बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या,वाजंत्री,सनया,ढोल,ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात.या वेळेस ‘झडत्या’ (पोळ्याची गीते) म्हणायची पद्धत आहे.त्यानंतर, ‘मानवाईक’ (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील,श्रीमंत जमीनदार) यांच्यातर्फे तोरण तोडले जाते व पोळा ‘फुटतो’. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेऊन ओवाळण्यात येते. बैल नेणा-यास ‘बोजारा’ (पैसे) देण्यात येतात. शेतक-याच्या घरी बैलांचे स्वागत करण्यासाठी सुवासिनी सडा व रांगोळ्या काढून त्या पाहुण्यांची वाट पाहत असतात. तर घरात चुलीवर लाडक्या पाहुण्यासाठी खरपूस पुरणपोळी तयार होत असते. दुपारी खळ्यात बैलाला आमंत्रित करण्यासाठी शेतकरी सपत्नीक वाजतगाजत जातात व त्याला ‘अतिथी देवो भव:’प्रमाणे घरी आणतात. घरातील सुहासिनी बैलांची विधिवत पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य देतात.
पोळ्याचे महत्त्व शेतकरीवर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. शेतक-याचा सखा,मित्र सर्जा-राजाचा आजचा दिवस मानाचा असतो. या दिवशी बैलांचा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासून आराम असतो. तुतारी (बैलांना हाकण्यासाठी वापरण्यात येणारी काडी ज्याचे टोकास, बैलांना टोचण्यासाठी टोकदार लोखंडी खिळा लावला असतो) वापरण्यात येत नाही. पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. असा हा पोळ्याचा सण आहे. पोळ्यास ‘बैलपोळा’ असे देखील म्हणतात. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आहे. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. शेतीप्रधान या देशात शेतक-यांत या सणाला विशेष महत्त्व आहे. या वेळेस पावसाचा जोर कमी झालेला असतो. शेतात पीकधान्य झुलत असते. सगळीकडे हिरवळ असते. श्रावणातले सण संपत आलेले असतात. एकूण सर्वत्र आनंदाचे वातावरण असते.
त्यासोबत त्यांच्यापुढे गहू-ज्वारीचे दान मांडतात. या दिवशी गावातील इतर घरातूनही बैलांना जेवणासाठी आमंत्रित केले जाते. शेतक-याला औक्षण करून त्याला नारळ दिले जाते तर बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. महाराष्ट्रातील काही गावांमध्ये या दिवशी बैलांच्या शर्यतीचे आयोजन करून तेथे पोळा फोडला जातो. ज्या शेतक-याचा बैल पोळा फोडेल म्हणजेच शर्यत जिंकेल त्या बैलाच्या अंगावर ग्रामपंचायतीतर्फे झूल टाकली जाते व शेतक-याच्या डोक्यावर फेटा बांधून त्याचा सन्मान केला जातो. त्यानंतर गावातून बैलांची सवाद्य मिरवणूक काढली जाते. अशा पारंपरिक पद्धतीने मोठय़ा उत्साहपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्रात शेतक-याचा जिव्हाळ्याचा सण पारंपरिक पोळा साजरा केला जातो.
याच पिठोरी अमावस्येच्या दिवशी सुवासिनी स्त्रिया व्रत करतात. दिवसभर उपवास करून सायंकाळी स्नान करतात. चौसष्ट योगिनींच्या चित्राच्या कागदाची पूजा करतात. घरातील मुलास अथवा मुलीस खीरपुरीचे जेवण देतात. पुरणपोळी खांद्यावरून मागे नेत ‘अतित कोण?’ असा प्रश्न विचारतात. आपल्या मुलाचे नाव घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर देतात. स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभावे यासाठी पिठोरी अमावस्येला फक्त स्त्रियाच हे व्रत मनोभावे करतात. बहिणाबाई आपल्या कवितेत म्हणतात,
आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सण मोठा, हातीं घेईसन वाट्या, आतां शेंदूराले घोटा, आतां बांधा रे तोरनं, सजवा रे घरदार …
-सुरेश मंत्री, अंबाजोगाई संपर्क – ९४०३६५०७२२

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.