Press "Enter" to skip to content

ऋतुहिरवा

   निसर्गाने नटलेली ही जीवसृष्टी बघा..! हिरव्या रंगाची बरसात करत मनाला उभारी देणारा, मनाला आनंदी ठेवणारा, धुंद होवून नाचावे असे वाटणारा ! आणि मन टवटवीत ठेवणारा असा हा श्रावण किती सुंदर!  अहाहा..!
आज जरा सकाळी लवकरच  पक्षांच्या किलबिलाटाने आणि कोकिळेच्या मधुर आवाजाने जाग आली आणि  गच्चीवर कधी जाते असे झाले, इतके सुंदर निरभ्र आकाश आणि पुर्व दिशेला तांबड्या रंगाचे व काहीशे सोनेरी झालेले मेघ, आणि विहार करत असलेला पक्षांचा थवा! सूर्यदेवता येण्याची वाट बघत मी गच्चीतच थांबले..हळूहळू गडद रंग झाला अलगद पणे तेजोमय सुर्याचे दर्शन झाले. इतके विलोभनीय दृश्य, मला एकदम कन्याकुमारीची आठवण झाली.आणि त्यात श्रावण म्हंटले कि, सगळीकडे प्रसन्नता, उत्साही वातावरणात मन जणू फुलपाखरासारखे बागडायला लागते.सुर्यदेवाला नमस्कार केला आणि कामाला लागले. काही वेळातच काळेभोर मेघ दाटून आले, रिमझिम बरसात करत पावसाने सुरुवात केली खरी, पण क्षणात झाडे डोलायला लागली,आणि अचानक पुन्हा सुर्याने दर्शन दिले. यालाच आम्ही लहानपणी उन पावसाचा खेळ म्हणायचो..!सृष्टी जणू हिरव्या रंगाची बरसात करते असा भास झाला, आणि मग या नभात जादू व्हावी आणि अचानक इंद्रधनुष्याचा सप्तरंगांचा सुंदर गोफ बघून मन आनंदून गेले, क्षणभर वाटले  निसर्गाची ही एवढी मोठी स्क्रीन आणि त्यावरील हा सप्तरंगांचा सुंदर नजारा..अहाहा..! डोळ्याची पारण फिटल्यागत मी बघतच राहीले एकटक…!!
श्रावणसरींत न्हावून निघालेली आणि तप्त झालेली धरणीमाता तृप्त होवून तिच्या सुगंधाने मन आणखीनच प्रसन्न झाले. हिरवा मखमली गालीचा पांघरलेला व सुंदर पांढरे शुभ्र धबधबे जेव्हा उंचावरून कोसळतात, ते विलोभनीय दृश्य मी डोळ्यात साठवून ठेवते..कारण ते दृश्य बघून आपण प्रगतीच्या कितीही उच्च शिखरावर पोहोचलो तरी..आपले पाय नेहमी जमिनीवरच असावे याची जाणीव प्रकर्षाने होते.
    झाडांचे आनंदाने डोलणे, त्यांच्या पानांचा सळसळता आवाज,आणि फुलांच्या वासाने मन प्रफुल्लित करते .पानांवर पडलेले दव जणू उन्हाच्या किरणांने हिऱ्याप्रमाणे भासतात. आणि या रिमझिम पडणाऱ्या  श्रावणसरीत मोर आपले नृत्य करत आनंदाने थुईथुई नाचतो. ते बघून मला पटकन एक गाणं आठवलं आणि मलाही नाचावसं वाटलं, मी चक्क बालपणातच  पोहोचले..नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच रे मोरा नाच…नंतर बागड बमबम बमबम, बाजे डमरू,बाजे डमरू, नाच रे मयूर..! ऋतु हिरवा, ऋतू बरवा, पाचुचा वनी रुजवा..! श्रावणसरींत इंद्रधनुष्याच्या  वेगवेगळ्या रंगाप्रमाणे मला एक एक गाणे आठवले…! आणि सरत्या श्रावणाला नतमस्तक होवून, त्या रंगात मी श्रावणमयी होवून गेले ! आणि तुम्ही…..?

मानसी जोशी, खांदा कॉलनी

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.