Press "Enter" to skip to content

गरजू विद्यार्थ्यांना मोफत वही व छत्री वाटप


शिवाजीनगर वसाहतीत शिवसेनेचा सामाजिक उपक्रम; शेकडो विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

पनवेल, दि. 14 (वार्ताहर) : आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने शिवाजीनगर वसाहत, प्रभाग क्रमांक 17 व 20 येथे मोफत वही व छत्री वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात शेकडो विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्यांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा सल्लागार तथा माजी नगरसेवक रमेश गुडेकर आणि शिवसेना पनवेल उपमहानगर समन्वयक राहुल गोगटे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना दिलासा मिळाल्याची भावना पालकांनी व्यक्त केली.
यावेळी पनवेल महानगर प्रमुख तथा नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत नियमित अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या बळावर यश संपादन करण्याचे आवाहन केले. तसेच समाजातील वंचित घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

पनवेल शहर प्रमुख प्रसाद सोनावणे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत शिवसेना समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबवत असून शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात अशा उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे नमूद केले.

या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन शिवसेना पनवेल शहर प्रसिद्धी प्रमुख तोफिक बागवान आणि शिवसेना उपविभाग प्रमुख गुलाब बागवान यांनी केले. त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांचे सहकार्य लाभल्याबद्दल आभार व्यक्त केले.

कार्यक्रमास शाखाप्रमुख अनिकेत जयस्वाल, सिद्धेश पवार, रसूल बागवान, इम्रान बागवान, शैलेश शिंदे, संदीप जयस्वाल, अरुण धोत्रे, ईशान बागवान, राहुल शिंदे, वैभव जाधव यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी अशा सामाजिक उपक्रमांची गरज अधोरेखित करत भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.