
पाताळगंगाच्या नव्या नेतृत्वाने स्वीकारली समाजसेवेची धुरारोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचा सेवा संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न ; रो.देवेंद्र महिंद्रकर अध्यक्ष तर रो.नागेश कदम सचिवपदी विराजमान
रसायनी (आनंद पवार) सामाजिक बांधिलकी सेवा आणि नेतृत्वाचा संगम ठरलेल्या रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या रोटरी वर्ष २०२६-२७ च्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन ८ जुलै रोजी खालापूर येथील स्प्री रिसॉर्ट येथे उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.यावेळी रो.देवेंद्र महिंद्रकर यांनी अध्यक्षपदाची तर रो. नागेश कदम यांनी सचिवपदाची धुरा स्वीकारत नव्या संचालक मंडळासह पदभार स्वीकारला.
रोटरी वर्ष २०२५-२६ चे अध्यक्ष रो.विजय पाटील आणि सचिव रो.गणेश वर्तक यांनी आपल्या कार्यकाळातील विविध सेवा उपक्रमांचा आढावा घेतला. क्लबच्या कार्यात मोलाचे सहकार्य करणाऱ्या सदस्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व सचिव यांच्याकडे पदभार विधिवत सोपविण्यात आला.समारंभाला रो.डॉ.जिग्नेश पंड्या आणि A.G.रो.रतन खरोल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी A.G.रो.रतन खरोल यांनी प्रांतपाल नितीन ढमाले यांच्या शुभेच्छा उपस्थितांसमोर वाचून दाखवत आगामी रोटरी वर्षासाठी संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ मधील द.रोटरी फाउडेशनचे संचालक असलेले रो.डॉ.जिग्नेश पंड्या यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रोटरी फाउंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सेवा प्रकल्पांचे महत्त्व,CSR निधीची उपयुक्तता आणि समाजहितासाठी रोटरीच्या कार्याची दिशा प्रभावीपणे स्पष्ट केली.कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीताने झाली.त्यानंतर गणेश वंदना,छत्रपती शिवाजी महाराज वंदना,पुष्पमालिका अर्पण आणि मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी अध्यक्ष रो.गणेश काळे यांच्या सुश्राव्य अभंग गायनाने वातावरण भक्तिमय झाले.तसेच उपस्थित सर्व निमंत्रितांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट व सुंदर सूत्रसंचालन फर्स्ट लेडी डॉ.प्रतिभा महिंद्रकर यांनी आपल्या ओघवत्या आणि प्रभावी शैलित केले. त्यांच्या निवेदनाला प्रमुख पाहुण्यांसह उपस्थित मान्यवरांनी विशेष दाद दिली.या पदग्रहण सोहळ्यास रसायनी पाताळगंगा परिसरातील अनेक मान्यवर,व्यापारी असोसिएशन,प्रेरणा परिवार,प्रायमाचे डॉक्टर्स,रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाचे सर्व सन्माननीय सदस्य विविध रोटरी क्लबचे रोटरीयन,निसर्ग यात्री असोसिएशनचे सदस्य याचबरोबर विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी म्हणून खालापूर पंचायत समितीचे विद्यमान सभापती कृष्णाशेठ पारंगे,वासाबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच रो.उमाताई संदीप मुंढे तसेच अल्काइल अमाईन्स लिमिटेड कंपनीचे सीएसआर प्रतिनिधी रवींद्र ओंकार उपस्थित होते.रोटरी क्लब ऑफ पाताळगंगाच्या वतीने तीनही मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष रो.देवेंद्र महिंद्रकर यांनी आपल्या मनोगतात क्लबच्या माध्यमातून शिक्षण,आरोग्य, पर्यावरण संवर्धन, रक्तदान,महिला सक्षमीकरण युवक विकास तसेच सामाजिक हिताच्या विविध उपक्रमाना अधिक गती देण्याचा निर्धार व्यक्त केला. तर विद्यमान सचिव रो. नागेश कदम यांनीही आगामी वर्षात सर्व सदस्यांच्या सहकार्याने समाजपयोगी प्रकल्प प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त केला.कार्यक्रमाची सांगता रोटरीच्या फोरवे टेस्टने करण्यात आली. संपूर्ण पदग्रहण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध दिमागदार आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला नव्या नेतृत्वाकडून पाताळगंगा रसायनी परिसरात अधिक व्यापक सामाजिक उपक्रम राबवले जातील असा विश्वास उपस्थित मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आला




Be First to Comment