
पनवेल, प्रतिनिधी : अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आरोपींना सद्बुद्धी मिळावी तसेच संबंधितांवर प्रशासनाने कठोर व निष्पक्ष कारवाई करावी, या मागणीसाठी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने खान्देश्वर येथील पुरातन शिव मंदिरात ‘रघुपती राघव राजाराम’ भजन म्हणत शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील विविध मंदिरांमध्ये काँग्रेसतर्फे हा सत्याग्रह आयोजित करण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून पनवेलमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंदिर परिसरात एकत्र येत ‘रघुपती राघव राजाराम’ हे भजन गाऊन श्रीरामांच्या चरणी प्रार्थना केली. मंदिरातील कथित देणगी चोरी प्रकरणातील दोषींना सद्बुद्धी मिळावी, सत्य जनतेसमोर यावे आणि संबंधितांवर निष्पक्ष व कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी उपस्थितांनी भावना व्यक्त करत सांगितले की, देशातील कोट्यवधी भाविक श्रीराम मंदिरावर अपार श्रद्धा ठेवतात. भाविकांनी विश्वासाने अर्पण केलेल्या देणग्या आणि भेटवस्तूंमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप अत्यंत गंभीर असून, अशा घटनांमुळे धार्मिक संस्थांवरील जनतेचा विश्वास डळमळीत होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे.
यानंतर पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन सादर केले.
या सत्याग्रहात पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा डॉ. श्रुती शाम म्हात्रे, शशीकला सिंग, राकेश चौहान, रोहिणी खोंड, विजय केणी, अजय कापरे, लतीफ नालखंडे, चेतन म्हात्रे, विलास म्हात्रे, अमित दवे, केसर ठाकूर, बबन केणी, सायरा अहमद, सोनिया साहोता, अभिजित मुनगळवार, जोशीत, जेम्स, दीपक गुंजाळ, एकनाथ ठोंबरे, स्नेहा मोटे, राजूभाऊ, रवी गायकवाड, पद्मिनी वाघमारे यांच्यासह महिला काँग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
आंदोलनादरम्यान शांततेचा मार्ग स्वीकारत भजन, प्रार्थना आणि सत्याग्रहाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्यात आली.




Be First to Comment