
पनवेल, दि. : विजया हरिभाऊ पोटे आणि हरिभाऊ हरिभाऊ नारायण पोटे यांच्या स्मरणार्थ वेनम स्पोर्ट्स फुटबॉल अकादमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ‘+1 ग्रासरूट डेव्हलपमेंट लीग २०२६’ ही फुटबॉल स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. लहान वयातील फुटबॉलपटूंना स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला खेळाडू, पालक आणि क्रीडाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
स्पर्धेच्या समारोपप्रसंगी पनवेल महापालिकेचे नगरसेवक सुमित झुंजारराव, उरणचे उद्योजक दीपकशेठ ठाकूर, राज ठाकूर, मानस ठाकूर तसेच वेनम अकादमीचे तनमय सर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेतील अंडर-१० गटात अंतिम सामन्यात Ace FC संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले, तर Venom FA संघ उपविजेता ठरला. तसेच अंडर-८ गटात Kickstart FA संघाने विजेतेपद मिळविले, तर Ace FC संघाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
स्पर्धेदरम्यान बाल फुटबॉलपटूंनी उत्कृष्ट कौशल्य, शिस्त आणि खेळाडूवृत्तीचे दर्शन घडविले. ग्रामीण व शहरी भागातील उदयोन्मुख खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या लीगमुळे अनेक नवोदित खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्याची संधी मिळाली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी वेनम स्पोर्ट्स फुटबॉल अकादमीचे कौतुक केले. भविष्यातही अशा स्पर्धांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर फुटबॉलला अधिक चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी बोलताना उरणचे उद्योजक दीपकशेठ ठाकूर यांनी या स्पर्धेचे कौतुक करून आगामी काळात या स्पर्धेसाठी पूर्णतः मदत माझ्या तर्फे करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.




Be First to Comment