
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना नेते तथा माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणी, नागरिकांच्या समस्या आणि आगामी पक्षीय उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
कामोठे येथे नगरसेविका मेघना घाडगे यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या घोषणेनुसार ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत येत्या काही दिवसांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सर्व नगरसेवक आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले.
यावेळी अनंत गीते यांनी नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सक्रिय राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच मध्यवर्ती कार्यालयात नियमित उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींचा पाठपुरावा करून त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देशही त्यांनी दिले. याशिवाय संघटनात्मक बळकटी, आगामी कार्यक्रम आणि विविध राजकीय विषयांवरही चर्चा झाली.
बैठकीस शिवसेना उपनेते बबनदादा पाटील, सहसंपर्क प्रमुख अनिल चव्हाण, जिल्हाप्रमुख दिपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील व भरत पाटील, महानगरप्रमुख समाधान काशीद, गटनेत्या लीना गरड, रामदास गोवारी, प्रवीण जाधव, यतिन देशमुख, प्रभाकर गोवारी, सुनील गोवारी, विनय गोवारी, सिद्धेश चव्हाण यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Be First to Comment