Press "Enter" to skip to content

सीकेटी महाविद्यालयात ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा; लोकसंख्या व शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

पनवेल (प्रतिनिधी)  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, नवीन पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आज ( ११ जुलै) ‘जागतिक लोकसंख्या दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, तिचे सामाजिक व आर्थिक परिणाम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.

कार्यक्रमाच्या प्रारंभी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाच्या उद्देशाविषयी माहिती दिली. त्यांनी लोकसंख्या आणि विकास यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत या विषयाचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. प्रमुख वक्ते तथा व्यावसायिक अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. ए. के. दीक्षित यांनी ‘जागतिक लोकसंख्या दिन’ या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी भारतातील वाढती लोकसंख्या, तिची प्रमुख कारणे, आर्थिक व सामाजिक परिणाम, नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण, रोजगार, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि शाश्वत विकासावर होणारे परिणाम यांची माहिती दिली. तसेच लोकसंख्या नियंत्रणासाठी जनजागृती, शिक्षण, महिलांचे सक्षमीकरण, कुटुंब नियोजन आणि शाश्वत विकासाच्या धोरणांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. 

या कार्यक्रमात अर्थशास्त्र विभागातील ७९ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विषयासंदर्भात विविध प्रश्न विचारून चर्चेत सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्याविषयक समस्यांबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. तसेच जबाबदार नागरिक म्हणून समाजाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव अधिक दृढ झाली.  या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. के. पाटील तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (आय.क्यू.ए.सी.) समन्वयक डॉ. बी. डी. आघाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. बी. एस. पाटील, प्रा. एच. एस. खरात आणि डॉ. के. बी. ढोरे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.