


पनवेल : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) च्या वतीने रायगड जिल्हा परिषद शाळा, चावणे येथे ‘स्वच्छता पखवाडा’ ही विशेष मोहीम अत्यंत उत्साहात राबविण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना चांगल्या सवयींची ओळख करून देणे हा होता.
या कार्यक्रमाला HPCL चे मॅनेजर मरुला स्वामी आणि HPCL चे सुपरवायझर प्रवीण लबडे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच चावणे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुलभा तायडे व इतर शिक्षिका उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले व त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या मोहिमेअंतर्गत विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजा आणि पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन उपयुक्त वस्तूंचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना पेन्सिल किट, छत्री, आणि स्केचपेन यांचे वाटप करण्यात आले. शाळेचा परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी HPCL तर्फे शाळेला डस्टबिन, झाडू यांसारखे स्वच्छता साहित्य भेट देण्यात आले.
केवळ साहित्याचे वाटप न करता, मुलांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व रुजवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेच्या विषयावर अतिशय सुंदर आणि संदेशात्मक ड्रॉइंग काढली. तसेच मुलांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे अभ्यासपूर्ण निबंध देखील लिहून काढले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या सर्व मुलांना प्रोत्साहनपर गिफ्ट्स देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी, शाळेच्या आवारात मान्यवर, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. निसर्गाचे रक्षण आणि परिसराची स्वच्छता राखण्याची प्रतिज्ञा या वेळी सर्वांनी घेतली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुलभा तायडे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल HPCL प्रशासनाचे व उपस्थित अधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानले.


Be First to Comment