
“हेल्प फाउंडेशनला सुरक्षा साहित्याची साथ, मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे यांचे सकारात्मक पाऊल”
कर्जत : प्रतिनिधी
कोणतीही आपत्ती असो, महामार्गावरील भीषण अपघात असो, पूरपरिस्थिती, दरडी कोसळणे, धबधब्यात अडकलेले पर्यटक, वन्यजीव बचाव किंवा कोणतेही नैसर्गिक संकट शासकीय यंत्रणांसोबत खांद्याला खांदा लावून कोणत्याही अपेक्षेशिवाय जीव धोक्यात घालून मदतकार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. याच सामाजिक जाणीवेतून मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी हेल्प फाउंडेशनच्या आपत्कालीन बचाव कार्यासाठी आवश्यक असलेली सुरक्षा संसाधने व साहित्य उपलब्ध करून देत संस्थेच्या कार्याला मोलाची साथ दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किसन जावळे आणि रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून अत्याधुनिक संसाधने उपलब्ध करण्यासाठी हे दोघेही सातत्याने प्रयत्नशील आहेत.
कर्जत येथे सुधाकर घारे यांच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ही सुरक्षा संसाधने हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि निलेश कुदळे यांच्याकडे केतन बेलोशे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. हा केवळ साहित्य वितरणाचा कार्यक्रम नव्हता, तर गेली अनेक वर्षे निःस्वार्थ भावनेने कार्य करणाऱ्या हेल्प फाउंडेशनच्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या समर्पणाचा गौरव करणारा क्षण होता.
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वयंसेवकांना बचावकार्य करताना आधुनिक सुरक्षा साधनांची नितांत आवश्यकता असते. योग्य सुरक्षा संसाधने उपलब्ध असतील तर बचावकार्य अधिक वेगवान, सुरक्षित आणि प्रभावी होऊ शकते. हीच गरज ओळखून मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी पुढाकार घेत संस्थेला आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. या उपक्रमातून सामाजिक संस्थांवर दाखविलेला विश्वास आणि त्यांच्या कार्याला दिलेली प्रत्यक्ष साथ ही निश्चितच प्रेरणादायी आहे. शासन आणि सामाजिक संस्था यांच्यातील समन्वय अधिक मजबूत झाला तर आपत्तीच्या काळात नागरिकांना अधिक जलद आणि परिणामकारक मदत मिळू शकते, हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित झाला.
हेल्प फाउंडेशनच्यावतीने मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच कार्यक्रमाचे आयोजन करणारे सुधाकर घारे यांच्याप्रती मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. या सुरक्षा साहित्यामुळे संस्थेच्या स्वयंसेवकांचा आत्मविश्वास वाढणार असून, भविष्यातही अधिक सुरक्षित आणि सक्षम पद्धतीने आपत्कालीन सेवेत सहभागी होता येईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
हेल्प फाउंडेशनचे कार्य हे केवळ बचावकार्य नाही, तर संकटात सापडलेल्या प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही एकटे नाही’ हा विश्वास देण्याचे कार्य आहे. अशा कार्याला मिळणारी प्रत्येक मदत ही केवळ एका संस्थेची ताकद वाढवत नाही, तर संपूर्ण समाजाची आपत्तीला सामोरे जाण्याची क्षमता अधिक सक्षम बनवते.


Be First to Comment