
रसायनी : (आनंद पवार)
रायगड जिल्हास्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांवर मोठी कारवाई करत पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथील एका किराणा दुकानावर धाड टाकून ₹८८९६८/- किमतीचा केशरयुक्त विमल पान मसाला गुटखा जप्त केला.या प्रकरणी दोघांविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवार दि.९जुलै २०२६ रोजी एलसीबीचे सहाय्यक फौजदार संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील व त्यांच्या पथकाने भोकरपाडा येथील किरणा दुकानावर छापा टाकला. छाप्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला केशरयुक्त विमल पान मसाला गुटखा विक्रीसाठी साठवून ठेवल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ ₹८८,९६८ किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी नितेश ज्ञानेश्वर पाटील (वय ३०) रा.भोकरपाडा, ता.पनवेल) व दिनेश मकीजा (रा.बदलापूर) यांच्याविरुद्ध रसायनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 108/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 123,274,275,223 तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा अधिनियम,2006 व संबंधित नियमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरची कारवाई रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे,स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने पार पाडली.त्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील,सहाय्यक फौजदार संदीप पाटील,पोलीस हवालदार रवी मुंडे, शरद फरांदे, रणजितसिंह खराडे आणि पोलीस शिपाई प्रदीप खरात यांनी सहभाग घेतला. कारवाईनंतर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना व जप्त मुद्देमाल रसायनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला.
प्रतिबंधित गुटख्याची विक्री व साठवणूक करणाऱ्यांविरोधात रायगड एलसीबीने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे या धडक कारवाईतून स्पष्ट झाले असून,अशा बेकायदेशीर व्यवसायांवर पुढेही सातत्याने कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यापुढील अधिक तपास रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलीस करत आहेत


Be First to Comment