
पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पायी निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, पनवेल (रायगड) यांच्या वतीने मोफत औषध वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. जिल्हाप्रमुख राजाभाऊ नलावडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, आजिवली येथे पार पडला.
भाताणपाडा ते पंढरपूर अशी परंपरागत श्री विठ्ठल रुक्मिणी पायी कोकण दिंडी मार्गस्थ होत असताना शेकडो वारकऱ्यांना मोफत औषधांचे वितरण करण्यात आले. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला वारकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष रामहरी राऊत, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख (पनवेल विधानसभा) तथा पनवेल महानगरपालिका नगरसेवक रामदास शेवाळे, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख (उरण विधानसभा) विनोद साबळे, शिवसेना तालुका प्रमुख रघुनाथ पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड जिल्हाप्रमुख राजाभाऊ मारुती नलावडे, पनवेल महानगरप्रमुख प्रशांत गायकवाड, पनवेल शहर प्रमुख रवी पाटील, नवीन पनवेल शहर प्रमुख किशोर जाधव यांच्यासह शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी वारकरी संप्रदायाच्या सेवाभावी परंपरेचे कौतुक करत समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सातत्याने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला. वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.





Be First to Comment