
पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः एनबीकेसी रायगडच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांनी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते खेळाडू व प्रशिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला.
न्यू बॉम्बे कराटे क्लब, रायगडच्या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. कराटेपटू फॉस्टिना फर्नांडो हिने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दक्षिण आशिया कराटे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याच स्पर्धेत अनात्रा समीत करांडे हिने राज्यस्तरीय सुवर्णपदक विजेती म्हणून आपली कामगिरी कायम राखत राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशामागे प्रशिक्षक योगेश कांबळी आणि प्रशिक्षक बिपीन राय यांचे मार्गदर्शन व परिश्रम मोलाचे ठरले आहेत. खेळाडूंनी केलेल्या मेहनतीमुळे न्यू बॉम्बे कराटे क्लबला राष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली आहे. न्यू बॉम्बे कराटे क्लबचे अध्यक्ष रोहन यादव यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन करत आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यासाठी क्लब सातत्याने प्रयत्नशील आहे.





Be First to Comment