Press "Enter" to skip to content

पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी मुलभूत सुविधांबाबत तातडीने कारवाई करण्याची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी


पनवेल, दि.2 (वार्ताहर) ः पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांना निवेदन सादर करून करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, नगरसेविका तथा गटनेत्या लिना गरड, नगरसेवक उत्तम मोर्बेकर, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, सदानंद शिर्के, अजय पाटील, कैलास पाटील, मा.सरपंच घोट सुनील पाटील, सिद्धेश चव्हाण, तुषार निढाळकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपनेते बबनदादा पाटील यांनी सांगितले की, मुंबईचे प्रवेशद्वार तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालगत असलेल्या पनवेल शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण प्रकल्प, औद्योगिक विकास, शैक्षणिक संस्था आणि व्यापारी संकुले उभी राहत असताना नागरिकांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांवर अपेक्षित प्रमाणात काम होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. तसेच संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांनी सांगितले की, शिवसेनेने पनवेलकरांसाठी शाश्वत पिण्याच्या पाण्याचा आराखडा जाहीर करण्याची प्रमुख मागणी केली आहे. सिडकोकडून होत असलेला विद्यमान पाणीपुरवठा भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता अपुरा पडण्याची शक्यता असल्याने शिलार धरण, देहरंग धरणाची उंची वाढविणे, नवीन जलस्रोतांचा शोध, जलशुद्धीकरण प्रकल्प उभारणी आणि वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण यासाठी निश्चित कालमर्यादेसह कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

तर जिल्हाप्रमुख दिपक निकम यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महापालिका क्षेत्रातील 50 हून अधिक जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतरण अद्याप प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा मिळण्यात अडथळे येत आहेत. या शाळांचे तातडीने महापालिकेकडे हस्तांतरण करून दर्जेदार वर्गखोल्या, प्रयोगशाळा, डिजिटल शिक्षण, स्वच्छतागृहे, क्रीडा साहित्य आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. पनवेलच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिकेने तातडीने ठोस निर्णय घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी शिवसेनेद्वारे करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.