

नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांवर नियंत्रणासाठी खोपोली पोलीस स्टेशन सज्ज : डॉ विशाल नेहूल
खोपोली : प्रतिनिधी
“आपत्तीची नको भीती, पूर्वतयारी हीच नीती” या ब्रीदवाक्याला केंद्रस्थानी ठेवत खोपोली पोलीस ठाण्याच्या वतीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध आपत्कालीन परिस्थितींना सामोरे जाण्यासाठी विशेष मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या अध्यक्षतेखाली महाराजा मंगल कार्यालय येथे पार पडलेल्या या शिबिरातून आपत्तीसमयी त्वरित प्रतिसाद, संसाधनांची उपलब्धता आणि विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक सक्षम करण्याचा हेतू स्पष्ट करण्यात आला.
या शिबिरात खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी, खोपोली नगरपालिका अग्निशमन दल, हेल्प फाउंडेशन, यशवंती हायकर्स, पोलीस पाटील, महिला दक्षता समिती, पोलीस मित्र संघटना आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पावसाळ्यात उद्भवू शकणाऱ्या पूर, दरड कोसळणे, भूस्खलन, औद्योगिक आपत्ती (गॅस गळती), महामार्गावरील अपघात अशा विविध संकटांमध्ये कोणती उपाययोजना करावी, यावर या शिबिरात विशेष भर देण्यात आला. “संकटावर करू मात, देऊ एकमेकांना खंबीर साथ” हा संदेश यावेळी प्रभावीपणे मांडण्यात आला.
खोपोली नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी रणजीत पवार, परिवहन सभापती किशोर पाटील, हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, यशवंती हायकर्सचे पद्माकर गायकवाड आणि पोलीस शिपाई सचिन घरत यांनी आपत्कालीन प्रसंगी येणाऱ्या अडचणी, त्यावर मात करण्याचे मार्ग, आवश्यक समन्वय आणि सर्व घटकांनी एकत्रितपणे कसे कार्य करावे याविषयी मार्गदर्शन केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी खोपोलीतील प्रशासन, नागरिक आणि विविध सामाजिक संस्थांमध्ये संकटसमयी एकजुटीने कार्य करण्याची सशक्त परंपरा असल्याचे सांगितले. तसेच रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाला आधुनिक संसाधने आणि तांत्रिक साधने उपलब्ध करून देण्यात आल्याचे नमूद केले.
खोपोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आपल्या मनोगतात “प्रतिबंध, सावधगिरी आणि पूर्वतयारी” या त्रिसूत्रीवर भर देत सांगितले की, कोणतेही संकट अचानक येते; मात्र त्याचा परिणाम कमी करण्यासाठी वेळेपूर्वीची तयारी, जागरूकता आणि समन्वय हेच सर्वात प्रभावी शस्त्र आहे. त्यांनी सर्व घटकांनी पोलीस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून कायम सज्ज राहण्याचे आवाहन केले.
यावेळी पीएसआय पूजा चव्हाण यांनी खोपोली पोलीस ठाण्याकडे उपलब्ध असलेल्या आपत्कालीन संसाधनांची सविस्तर माहिती दिली. तसेच खोपोली नगरपालिका अग्निशमन दल आणि हेल्प फाउंडेशनकडील विविध बचाव साहित्यांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. नगरपालिकेची फायर ब्रिगेड व्हॅन, फायर मॅन बाईक, गोरखा व्हॅन तसेच स्वामिनी संस्थेची ॲम्ब्युलन्स यांचेही प्रदर्शन करण्यात आले. पीएसआय ज्ञानेश्वर एडवले यांनी शिबिरात सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडली.
या शिबिरातून आपत्ती व्यवस्थापनात वेळेवर प्रतिसाद, संसाधनांचे नियोजन, समन्वयाची साखळी आणि नागरिकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव सर्वांना करून देण्यात आली. एकंदरच, कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तिचा धैर्याने व सक्षमपणे सामना करण्यासाठी खोपोलीकर सज्ज असल्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.





Be First to Comment