Press "Enter" to skip to content

जमीन मोजणी तातडीने स्थगित करण्याची मागणी

तळोजा एमआयडीसीतील प्रस्तावित कत्तलखान्याला शेतकरी व नागरिकांचा तीव्र विरोध

पनवेल | प्रतिनिधी

मौजे चाल (तळोजा एमआयडीसी) येथे प्रस्तावित कत्तलखान्यासाठी जमीन मोजणी प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचालींना स्थानिक शेतकरी, ग्रामस्थ आणि भाविकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह बाधित शेतकरी आणि नागरिकांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून ३ जुलै रोजी होणारी जमीन मोजणी तातडीने स्थगित करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिकेने प्रस्तावित कत्तलखान्यासाठी बाधित होणाऱ्या जमीनमालक शेतकऱ्यांशी कोणतीही चर्चा अथवा सल्लामसलत न करता थेट जमीन मोजणीच्या नोटिसा पाठवल्या आहेत. संबंधित जागा ही तळोजा-पनवेल परिसरातील श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ व मंदिराजवळ असून येथे दररोज ठाणे व रायगड जिल्ह्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.

प्रस्तावित कत्तलखान्याचे ठिकाण घोट, चाल, सिद्धी करवले, तळोजा मजकूर, भोईरवाडा, गोंधळीवाडा आणि बुरडूल या गावांच्या मध्यवर्ती भागात येत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गावांतील नागरिक सिडको डम्पिंग ग्राउंड आणि मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पांमुळे आधीच प्रदूषणाच्या समस्यांना सामोरे जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

तसेच परिसरातून वाहणारी मलंग नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून भूजल, विहिरी आणि बोअरवेलचे पाणीही दूषित झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. दूषित पाणी पिल्यामुळे एका शेतकऱ्यांच्या सात गायींचा मृत्यू झाल्याचा दावाही निवेदनात करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत दुर्गंधीयुक्त कत्तलखाना उभारल्यास पर्यावरण, सार्वजनिक आरोग्य आणि धार्मिक भावनांवर विपरीत परिणाम होईल, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वीही स्थानिक नागरिकांनी विविध समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असतानाही कोणताही ठोस तोडगा निघालेला नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे प्रस्तावित कत्तलखान्याला सर्व शेतकरी, ग्रामस्थ आणि भाविकांचा तीव्र विरोध असून ३ जुलै रोजी होणाऱ्या जमीन मोजणी प्रक्रियेलाही विरोध करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील, संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, जिल्हाप्रमुख दीपक निकम, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, शहरप्रमुख प्रवीण जाधव, यतीन देशमुख, गटनेत्या लिना गरड, महानगरप्रमुख समाधान काशीद, अजय पाटील, कैलास पाटील, सुनील पाटील, नगरसेवक मोरबेकर, सिद्धेश यवाण, तुषार निढाळकर यांच्यासह सुनील शिवराम पाटील, कैवार कांतीलाल पाटील, अच्युत सुनील पाटील, अनिल शिवराम पाटील, रामकृष्ण शिवराम पाटील आणि दिलीप मंगल पाटील आदी उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.